Daryabhavani Movie poster release : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प ‘दर्याभवानी’ नव्या वर्षात १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या शुभमुहूर्त आणि भव्य पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी कलाकार तसेच दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांची विशेष उपस्थिती लाभली. आकर्षक पोस्टरने चित्रपटा विषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी विचारांना केंद्रस्थानी ठेवत, हिंदवी स्वराज्याच्या अभेद्य सागरी संरक्षणाची, आरमार उभारणीची, जलदुर्गांच्या रणनीतीची आणि समुद्रावरील मराठी सामर्थ्याची थरारक गाथा ‘दर्याभवानी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे, अजिंक्य पाटील आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार, सुरज सादमवार यांनी केली असून, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत. दीठी प्रॉडक्शन्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या गाजलेल्या सहा चित्रपटांनंतर दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा चित्रपट म्हणून ‘दर्याभवानी’ कडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. या प्रसंगी बोलताना निर्माते प्रकाश पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही या चित्रपटाद्वारे पार पाडत आहोत. संशोधन, वास्तवदर्शी मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्यांचा संगम असलेला ‘दर्याभवानी’ प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरेल.’
यावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘शिवरायांचा इतिहास म्हणजे केवळ गड-किल्ल्यांचा नव्हे, तर समुद्रावर अमर्याद अधिराज्य गाजविणाऱ्या स्वराज्याचाही इतिहास आहे. ‘दर्याभवानी’ च्या माध्यमातून त्यांच्या सागरी दूरदृष्टीचा, आरमार निर्मितीच्या अभूतपूर्व कार्याचा आणि जलदुर्गांच्या सामर्थ्याचा इतिहास प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय या चित्रपटातून उलगडेल.’ चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आणखी वाचा – कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर आणि…; हार्दिक पांड्याने केलं गुपचूप लग्न? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल
चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली असून, नितीन वाघ यांनी सहलेखक म्हणून योगदान दिले आहे. स्मिता शेवाळे या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. चित्रपटाचे छायांकन विजय खडके यांनी केले असून, संगीताची धुरा केदार दिवेकर आणि अवधूत गांधी यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांची रचना दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे. चित्रपटाचे ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, कला दिग्दर्शन प्रतीक रेडीज, साहसदृश्य दिग्दर्शन बब्बू खन्ना, नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे, वेशभूषा रोहिणी साळेकर आणि रंगभूषा अतुल म्हस्के यांनी केली आहे.




