आजही एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादे लहान मुल टीव्हीवर दिसले तरी अनेकजण त्याचे कौतुक करतात. अनेकांसाठी आपल्या कुटुंबातील एखादा लहान मुलगा, मुलगी टीव्हीवर दिसले तर त्यांच्यासाठी ही अभिमानासह आनंदाची बाब असते. असाच आनंद झाला आहे मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना. विशाखा सुभेदार या सध्याच्या घडीच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमधून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र त्यांच्या विनोदी भूमिकांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या विशाखा सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अशातच विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा खास व्हिडीओ त्यांच्या भाचीचा आहे. भाचीला पहिल्यांदाच टीव्हीवर पाहिल्यानंतरचा आनंद त्यांनी या व्हिडीओमधून व्यक्त केला आहे. विशाखा यांच्या भाचीने नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली असून या मालिकेतील तिच्या भमिकेचे विशाखा यांनी कौतुक केले आहे.
विशाखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या ‘राधा’ या भाचीचा ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील सीनचा व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओखाली त्यांनी “राधा. ‘आई कुठे काय करते’ माझी भाच्ची. आमची बाहुली” असं म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली विशाखा यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.