‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. अशातच या पात्राने नुकताच मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. अलीकडच्या एपिसोडमध्ये माईचा दुर्दैवी अंत दाखवण्यात आला. (Varsha Usgaonkar exit from serial)
मालिकेत माईंची ही भूमिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर साकारत होती. नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांना मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ वर्षा यांच्या नावावर होता. सिनेविश्वात काम करताना त्यांनी मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं होतं.
वर्षा यांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर केला आहे. वर्षा यांनी मालिकेतील पात्राचा प्रवास संपल्याने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं. वर्षा यांच्या या चित्रपटातून एक्झिट घेण्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही मालिका बऱ्याच काळापासून सुरु असल्याने याचा गोड शेवट करुन मालिका संपवावी असंही काहींनी म्हटले आहे.
अशातच मालिकेतून निरोप घेतल्यानंतर ‘माझं सुखाच माहेर सुटलं’ असं कॅप्शन देत वर्षा यांनी मालिकेतील जयदीप या पात्राबरोबरचे खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांना मिस करणार असल्याचं म्हटलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत “शेवटी तुम्हीही कंटाळलात ना? आमचे काय हाल होत असतील जरा विचार करुन पाहा”, असं म्हटलं आहे. यावर प्रतिउत्तर देत “मी नक्कीच कंटाळले नाही आहे. याउलट मला गहिवरुन आलं. तुमची गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे तुमच्या मताचा मी आदर करते”, असं उत्तर वर्षा यांनी दिलं आहे.