मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. मराठी नाटक, चित्रपट व मालिका अशा तिन्ही माध्यमांत अभिनय करत उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. मात्र अनेकदा त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल पैसे मिळाले नाहीत.
याबद्दल उषा नाडकर्णी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात भाष्य केलं. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मतदानाचा दिवस होता. त्यादिवशी मी आईकडे जायला निघाले होते आणि दारात चप्पल घालत होते. तितक्यात दोन पांढरे कपडे घातलेली माणसं येऊ उभी राहिली. तर मला असं वाटलं की, ते मतदानाचं काही सांगायला आले आहेत. कारण मी तेव्हा त्या दोघांनाही ओळखलं नाही. मग ते आत येऊ का असं म्हणाले. तर मी त्यांना या म्हटलं”.
पुढे उषा यांनी असं म्हटलं की, “तेव्हा त्यांनी मला एका चित्रपटात म्हातारीची भूमिका कर असं म्हटलं. तो चित्रपट होता ‘घनचक्कर’. मात्र त्या चित्रपटामधून मला एक पैसाही मिळाला नाही. तो माणूस आता या जगात नाही. पैसे मागण्यासाठी मी लाज सोडून आणि लोकांचं ऐकून सकाळी सात वाजता, बिछान्यातून उठवायला त्यांच्या घरी जाऊन बसायचे. तर ते मिळाले की देतो असं म्हणायचे. मात्र तेही गेले आणि पैसेसुद्धा मिळाले नाहीत”.
सुस्पष्ट आवाज, फटकळ स्वभाव आणि रोखठोक बोलणं यामुळे उषा नाडकर्णींचा सिनेसृष्टीतला दबदबा आजही कायम आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘महासागर’, ‘पुरुष’, ‘गुरु’ या नाटकांमधून कामं केली. त्यानंतर त्या चित्रपट आणि मालिकाकडे वळल्या. सिनेसृष्टीत त्या ‘आउ’ म्हणून चांगल्याच लोकप्रिय आहेत.