अभिनेता-निर्माता आणि टी-सीरीजचे सह-मालक कृष्ण कुमार यांच्या कुटुंबाशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. १८ जुलै रोजी त्यांची मुलगी तिशा कुमार हिचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिचं निधन झालं आहे. अभिनेत्याची ही मुलगी काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होती. तिच्यावर उपचारही सुरु होते. तिशा कुमारवर जर्मनीमध्ये उपचार सुरू होते. तिशाच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Tisha Kumar Death)
झूमवरील रिपोर्टनुसार, कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर निधन झाले. तिशा ही भूषण कुमारची चुलत बहीण असून ती बऱ्याच दिवसांपासून जर्मनीत राहत होती आणि तिच्यावर जर्मनी येथेच कॅन्सरवर उपचार सुरु होते आणि या उपचारादरम्यान काल तिचा मृत्यू झाला. टी-सीरीजच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की, कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे आणि आम्ही प्रत्येकाने कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. ही बातमी समजल्यानंतर सर्वजण सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त करत आहेत आणि तिशाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
कृष्णा कुमार हे टी-सीरीजचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. कृष्णाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये ‘आजा मेरी जान’ आणि १९९५ मध्ये ‘बेवफा सनम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्यांनी ‘एअरलिफ्ट’, ‘सत्यमेव जयते’सह अनेक चित्रपटांची सहनिर्मितीही केली आहे.