गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमण हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. विशाळगड अतिक्रमण वाद चिघळल्याची परिस्थिती आज रविवारी निर्माण झाली. संपूर्ण दिवसभर परिसरात तणावाचं वातावरण होतं. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड, वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने पंचक्रोशीमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. यावर अनेकजण त्यांची मतं व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेते किरण माने यांनीदेखील विशाळगड अतिक्रमणबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशाळगड अतिक्रमणावर लिहा की” अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांना येत होत्या आणि यावर त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे छत्रपती शिवाजी महराजांना वंदन करतानाचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “विशाळगड अतिक्रमणावर लिहा की.” अशी कमेंट्स गेल्या पंधरा दिवसांत अनेक अनोळखी अकाऊंटवरनं येऊ लागली. सगळी प्रोफाईल लॉक आहेत. सहसा आयटी सेलच्या गटारातली घाण पसरवायला अशी डुक्कर पिलावळ नेमलेली असते. बर्याच जणांच्या पोस्टवर मी अशा कमेंट बघितल्या. अतिक्रमण काय काल-परवाचं नाही. बर्याच वर्षांपासूनचं आहे. मग नेमकं आत्ताच का यावर असं रान पेटवलं जात आहे? मी उत्तर द्यायचो की “ही अतिक्रमणं हटवणं हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपले आहेत का? असले निष्क्रीय, भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसवले की हेच होणार”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अहो, शेंबडं पोरगंही सांगेल की, हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. सत्ताधार्यांकडे कुठला मुद्दाच हातात नाही. सगळे उद्योग गुजरातला गेलेत. बेरोजगारीचा कहर झालाय. पेपर फुटताहेत. रस्त्यांची दुर्दशा झालीय. शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्यात. मग यांच्या हातात एकच मुद्दा रहातो – ‘हिंदु-मुस्लीम’! बरं विशाळगडाच्या पायथ्याशी आणि गडावरचं हे जे अतिक्रमण आहे, ते सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी केलं आहे. आता गंमत अशी आहे की परवा जी दंगल घडवून आणली गेली, ती या दोन्ही ठिकाणी झाली नाही, ती झाली गजापूरला. अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तिथल्या मुस्लीम समाजाला विनाकारण टार्गेट करून प्रचंड प्रमाणात नासधूस करण्यात आली. याचाच अर्थ ही दंगल घडवणारे कुणी शिवभक्त नव्हते, कुणाच्या तरी आदेशावरून आलेले दंगलखोर होते. अतिक्रमण वगैरे नसून काहीतरी वेगळाच होता”.
आणखी वाचा – शुक्रवारी ‘या’ राशीच्या लोकांचे आयुष्य उजळणार, नोकरी व व्यवसायात आहेत लाभाच्या संधी, जाणून घ्या…
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “एवढे होऊनही महाराष्ट्र शांत आहे. कुठेही हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण झालेली नाही. कुठेही याचे हिंसक पडसाद नाहीत. पुन्हा एकदा सिद्ध झाले की हा शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत विशाळगडावरच्या दर्ग्याला हात लावला नाही. शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असलेला अस्सल मराठमोळा मावळा कधीच असल्या धर्मद्वेषाला बळी पडणार नाही. विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतीत महाराष्ट्र सरकारने त्वरित पावलं उचलावीत. कुठल्याही नागरिकाच्या जीवाची हानी न होता आणि कसलीही धार्मिक तेढ निर्माण न होता हे काम झाले पाहिजे”.
आणखी वाचा – अखेर चर्चा खऱ्या ठरल्या! हार्दिक-नताशा एकमेकांपासून कायमचे वेगळे, लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच मोडला संसार
भावाबहिणींनो, सरकारच्या मनात असेल तर हे काम सहजसोपे आहे. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, रस्त्यांची दुरावस्था, टोलनाक्यांवरची लूट, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, ड्रग्ज रॅकेट अशा अनेक भयानक गोष्टींचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे. आपण त्यावरून लक्ष हटवायचे नाही.
जय शिवराय..जय भीम !