बिनधास्त,बोल्ड व्यक्तिमत्व असलेली एक अभिनेत्री जिने आजवर तिच्या लुकच्या जोरावर तरुणाईला भुरळ घातली ती म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित. मालिका, चित्रपटांतून तेजस्विनीने स्वतःची अशी छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. याशिवाय स्वतःच्या कपड्यांच्या ब्रँडमुळेही ती सध्या चर्चेत असते. तसेच तेजस्विनी चर्चेत असते ती तिच्या हटके फोटोशूटमुळे. तेजस्विनीचा रावडी स्वभाव सर्वांनाच माहित आहे. तिच्या या रावडी स्वभावाचे अनेक किस्से आहेत. यातील एका तरुणाने अभिनेत्रीला केलेला स्पर्श आणि तिने शिकवलेला धडा असा एक किस्सा ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात तिने सांगितला. (Tejaswini pandit incident)
हा किस्सा सांगत तेजस्विनी म्हणाली, “अभिनयक्षेत्रात काम करत असताना उशिरा पर्यंत शूटिंग सुरु असायचं. आणि त्यामुळे शक्यतो रात्रीचा प्रवास करावा लागायचा. त्यावेळी मी मुंबईला राहायचे त्यामुळे मला घराची खूप आठवण यायची. घरी म्हणजे पुण्याला जायला मी रात्री ठाण्यावरून बसमध्ये बसले. संपूर्ण बस बऱ्यापैकी रिकामी होती त्यामुळे मी शेवटून तिसऱ्या सीटवर बसले. सीट रिकामी असल्याने मी सीटवर आडवी जाऊन झोपले.”
“त्यानंतर एक माणूस वाशीला चढला. आणि तो मागच्या सीटवर येऊन बसला. तो बसलेला असताना सीटच्या मध्ये जागा असते तिथून पायाचा स्पर्श होऊ लागला. सुरुवातीला आपण कधीकधी पाय वर ठेवून बसतो ना तर मला वाटलं चुकून झालं असेल. दुसऱ्यांदा ही मी दुर्लक्ष केलं. तिसऱ्यांदा तो पाय फिरताना जाणवला. आणि माझं डोकं फिरलं. त्यावेळी मी ठरवलं आता ह्याला सोडायचं नाही. आणि परत त्याने तसं करताच मी त्याचा पायच धरला. आणि मी उठले आणि मोठमोठयाने त्याच्याबरोबर बोलू लागले. त्याच्याशी वाद घालू लागले. त्याला मी तू मला स्पर्श करत होता का? तू नक्की काय करत होतास, असा जाब मी त्याला विचारत होते.”
“माझ्या आवाजाने बसवाले आले आणि तेही म्हणू लागले की, जाऊदे ना. हे ऐकल्यावर माझा पारा आणखीनच चढला, मी म्हटलं, हे तुमच्या घरातील एका बाईबरोबर झालं असत तर तुम्ही पाठीशी उभे राहिले असतातच ना. त्यानंतर मी त्या माणसाच्या कॉलरला पकडलं आणि पुढे येऊन त्याला माझ्या बाजूला घेऊन बसले. आता तुला सोडत नाही असं म्हणून मी त्याला माझ्या बाजूला बसवून ठेवलं. त्यानंतर शेवटी मी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला उतरले. मी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि मोकळा श्वास घेतला.