मराठी मालिकांमधून नावारुपाला आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने आजवर मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तेजश्रीने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. तिच्या या संपूर्ण प्रवास आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे. याबाबत तिने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच तिच्याबाबत एक दुःखद घटना घडली. तेजश्रीच्या आईचं निधन झालं. (Tejashri Pradhan On Mother)
तेजश्रीच्या आईचं निधन झालं असल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण तिच्या आईचं निधन नेमकं कशामुळे झालं, त्यामागचं कारण काय? हे अस्पष्ट आहे. तेजश्रीने याबाबत बोलणं टाळलं. पण आता पहिल्यांदाच तिने आईच्या निधनाबाबत भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याबाबत बोलली. यावेळी तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तेजश्री भावुक झाली.
‘मिरची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्रीला “तू सध्या कोणत्या मनस्थितीमध्ये आहेस?” असा प्रश्न तेजश्रीला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “मी प्रत्येक दिवस त्याच दिवशी जगते. सकाळी उठल्यानंतर दिवस कसा असणार आहे? हे मला माहितच नसतं. सगळ्यांनाच माहित आहे की, अलिकडेच मी माझ्या आईला गमावलं. मालिकेमध्ये सध्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट असतात”.
आईच्या निधनानंतर पुन्हा मालिकेत काम करण्यावरुन तेजश्री म्हणाली, “सहकलाकार खूप छान असतात. मालिकेमध्ये शुभांगी गोखले माझ्या आईची भूमिका साकारत आहे. ती मला खूप मदत करते. मालिकेमध्ये आमच्या दोघींचे आई व मुलीचे काही सीन होत असतात. या सगळ्यामध्ये हा संपूर्ण महिना माझ्यासाठी काही सोपा नव्हता. पण सगळ्यांनी मला सहकार्य केलं. ‘पंचक’च्या टीमनेही मला सांभाळून घेतलं. आपली इंडस्ट्री खोटेपणावर जगते असं आपण सतत म्हणत असतो. पण मी अभिमानाने सांगू शकते की, इंडस्ट्रीमध्येही माणूसकी आहे. या महिन्यामध्ये मी माणूसकी खूप अनुभवली आहे”. तेजश्री आता नव्या जोमाने कामाला लागली आहे.