Suruchi Adarkar Talks About Her Marriage : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली आहेत. या लग्नांमध्ये एका कलाकार जोडीच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ही कलाकार जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे. सुरुची व पियुष यांच्या लग्नाची बातमी समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुरुचीने ६ डिसेंबर २०२३ मध्ये तिने पियुष रानडेशी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याचं हे तिसरं लग्न असल्याने विवाहसोहळ्यातील फोटो समोर येताच दोघांनाही ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. दरम्यान, अनेकदा सुरुचीने या ट्रोलिंगला प्रतिउत्तर दिलेलं पाहायला मिळालं. यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न, ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे.
सुरुचीने ‘रेडिओ सिटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबाबत म्हटलं की, “हो मला हे अपेक्षित होतं कारण काय आहे तर आजपर्यंत पियुष माणूस म्हणून कोणापर्यंत पोहोचलाच नाही आहे. तो बोलतच नाही. आमच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा मला त्याच्याशी खूप गोष्टी स्वतःहून विचाराव्या लागायच्या. सुरुवातीला मी स्वतःहून त्याच्याशी संवाद साधायचे. त्याला मी बोलण्याची सवय लावली. तो फार नाही बोलायचा. पण एका काळानंतर मी त्याला बोलतं केलं. तो लोकांपर्यंत पोहोचलेला नव्हता हे मला कळालं, त्यात आताचे लोक तसेही जजमेंटल झाले आहेत आणि मला याचं अजिबात वाईट वाटत नाही. पण, आमच्या दोघांमध्ये कोणीतरी खंबीर राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि मी खंबीर आहे. मला माझ्या निर्णयांवर विश्वास असतो कारण, मी एखादी गोष्ट केल्यानंतर विचार नाही करत तर ती गोष्ट करण्याआधीच त्याचा विचार करते. म्हणून तो निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता”.
ती पुढे म्हणाली, “आजकाल आपण कोणलाही पाहून एखादी गोष्ट सहज बोलून जातो की, हे असं कसं झालं. पण, लोक जे बोलत होते ते आयुष्य आम्ही जगतोय याचा अर्थ आम्ही त्या गोष्टीचा सारासार विचार करुनच निर्णय घेतलेला आहे. मी सगळा विचार करुनच त्या माणसाला स्वीकारलंय. माणूस म्हणून जर तो चुकीचा असता तर, त्याच्याबरोबर कोणी का राहिलं असतं?, हा विचार माझ्या डोक्यात होता. तो जसा आहे तसं मी त्याला स्वीकारलं होतं. जर त्याच्या आयुष्यात काहीतरी घडलंय तर, त्याची झळ त्यालाच जास्त बसली आहे. त्यामुळे मला बोलणं कोणालाही बोलणं फार सोप्पं आहे, मला कोणत्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण भूतकाळ हा भूतकाळच असतो. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये कोणाची चूक आहे हे नसतंच. हे सगळं तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. अनेकदा दोघंही खूप चांगले असतात पण, त्यांचं एकमेकांशी नाही पटत. मग, त्यांनी अट्टाहासाने का एकत्र राहावं?. फक्त समाजात तुम्ही एकत्र आहात म्हणून तुम्ही एकत्र राहणं हे गरजेचं नाहीये. मला असं वाटतं की, ते लोक पण खूप सक्षम आहेत जे त्या परिस्थितीत वेगळं होण्याचा विचार करतात. नाहीतर अनेक जोडप्यांना काही वर्षांनी या गोष्टी समजतात की, अरे आपण फक्त मुलासाठी एकत्र राहिलो, समाजासाठी एकत्र आहोत. आपण आयुष्य जगलोय का? तर नाही जगलो. मग एकमेकांना त्रास न देता तुम्ही वेळीच जेव्हा बाजूला होता तेव्हा तो निर्णय खूप मोठा असतो. त्यामुळे मी त्याचं सगळं स्वीकारलं”.
लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगबाबत अभिनेत्री म्हणाली, “मला माहिती होतं की, लोक हे सगळं बोलणार. त्यामुळे लग्नाचे फोटो टाकताना आम्ही खूप विचार केला होता की काय करायचं? कारण आम्ही या बद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. याची चर्चा मला होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी फोटो टाकायचे असं आम्ही ठरवलं. कारण, आमच्या आयुष्यातली एवढी महत्त्वाची घटना आम्हाला चुकीच्या मार्गाने लोकांसमोर आणायची नव्हती. ती गोष्ट आदरपूर्वकच सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कसं होतं, लोकांना कळतं आणि मग चर्चा होते. त्यापेक्षा मग आम्हीच सांगितलं. खूप लोक बरंच काय-काय बोलले. आजही अनेक लोक बोलतात पण इंडस्ट्रीतून आम्हाला खरंच चांगले फोन आले. सगळं सुरळीत होईल असे अनेक कॉल्स आले. त्यामुळे कोणाला सिद्ध करुन दाखवयाची काहीच आवश्यकता नव्हती. त्यात माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा पाठिंबा मला होता. त्यात मी सुद्धा भयंकर खंबीर आहे. तुम्हाला बोलायचंय हे तुमचं मत आहे बोला. मला कोणासमोर काहीच सिद्ध करायचं नाही. आणि जरी मला माझा निर्णय योग्य होता, विचारपूर्वक केला होता हे सिद्ध करायचं असेल तर आता का करु?, असंही मला वाटत होतं”.