Nashik Malegaon Rape Case : सध्या नाशिक मालेगांव येथे घडलेल्या अक्षम्य गुन्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या साडे-तीन चार वर्षीय चिमुरडीवर झालेला हा बलात्कार आणि त्यानंतर झालेली निर्घृण हत्या याने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. २४ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिला दगडाने ठेचून निर्घुनपणे संपवलं. ही अत्यंत वेदनादायी अशी घटना आहे. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला असून काही कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. अशातच अभिनेत्री सुरभी भावेनेही इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत आवाज उठविला आहे.
सुरभीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “आज दिवसभर सतत मालेगावमध्ये छोट्याशा मुलीवर जो अत्याचार झाला ही एकच बातमी डोळ्यासमोर दिसतेय. कारण असं, त्या माणसाचं मुलीच्या वडिलांबरोबर काहीतरी भांडण होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं त्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिचं आयुष्य संपवलं, हे कारण त्या माणसानं सांगितलं. काही माणसांच्या अवयवांचा माज वेळीच ठेचायला हवा, तर आणि तरच पुढच्या लोकांना त्याची काहीतरी दहशत राहील. आता जर का आमचे छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्याचा चौरंग केला असता एव्हाना”.
आणखी वाचा – मॉड्युलर किचन, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे सूरज चव्हाणचं घर, पाहा Inside Video
पुढे सुरभी असं म्हणाली की, “माझी खूप मनापासून इच्छा आहे की, त्या माणसालासुद्धा हाल-हाल करुन त्याचं आयुष्य संपवण्यात यावं, कारण अर्थच नाहीये, तो जिवंत राहण्यात. त्या छोट्याशा बाळाला यातना देऊन त्याला काय आनंद मिळाला, त्याने कुठला बदला घेतला काही कळत नाही आहे. पण, लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी ही माझी एका आईची कळकळीची विनंती आहे. मग हे प्रकरण, फास्ट ट्रॅकमध्ये जाऊ दे किंवा सुपरफास्ट असू दे… पण, अशा केसेसमध्ये २४ ते ३६ तासांच्या आत निकाल लावला पाहिजे आणि त्या माणसाला निकालात काढलं पाहिजे, अशी माझी खूप-खूप कळकळीची विनंती आहे”.
पुढे ती म्हटलं, “त्याच्यासाठी जे कोणी अधिकारी आहेत, त्यांनी प्लीज काहीतरी ॲक्शन घ्या. एखाद्या जीवाशी खेळणं इतकं सोपं नाही आहे हे त्यांनाही कळलं पाहिजे. त्या छोट्याशा बाळाला श्रद्धांजली म्हणायलासुद्धा खूप त्रास होतोय”. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं “यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे!! हिंस्त्र मानसिकता असलेल्याला ठेचून काढणं योग्य तरच आपल्या भोवतीच्या लेकीं बाळी सुरक्षित असतील खूप त्रास होतोय ती बातमी पाहून”, असं कॅप्शन दिलं आहे.





