दिवस-रात्र काम करत असताना कलाकार बऱ्याचदा शूटमध्येच हरवून जातात. मालिका करत असताना तर १२ ते १५ तासांची शिफ्ट करणं तर तारेवरची कसरत. मेहनत करत नाव कमावणं हा एकमेव मार्ग. पण हे सगळं करत असताना कळत नकळत कलाकारांना शारीरिक त्रास होत असतात. म्हणूनच हातातला एखादा प्रोजेक्ट पूर्ण होताच ब्रेकची त्यांना गरज असते. शारीरिक त्रास लक्षात घेता असाच महत्त्वपूर्ण ब्रेक सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने यांनी घेतला. सुकन्या यांना काही शारीरिक त्रास जाणवत होते. म्हणूनच त्यांनी कामातून दीड वर्ष ब्रेक घेतला. आता त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (sukanya mone new Marathi serial)
आजारपण, ब्रेक अन्…
एक ते दीड वर्षांच्या ब्रेकनंतर सुकन्या यांनी पुन्हा मालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे. याचबाबत ITSMAJJA शी संवाद साधताना सुकन्या म्हणाल्या, “जाणून-बुजून घेतलेला हा ब्रेक होता. काही शारीरिक त्रास मला होते. मला या सगळ्या त्रासावर थोडं काम करायचं होतं. मनासारखी भूमिकाही मला मिळत नव्हती. तिच तिच भूमिका साकारण्यातही मला काही रस नव्हता. काहीतरी वेगळं मिळावं असं सतत मला वाटत होतं. त्याच त्याच भूमिका साकारुन आपण प्रेक्षकांच्या घरी जात असतो त्यांनाही कंटाळा येत असेल. काय सारखी ही गोड गोड बोलते असा तेही विचार करत असतील. कायतरी वेगळं प्रेक्षकांना मिळायला हवं असंही वाटत होतं. या मालिकेच्या माध्यमातून मला वेगळी भूमिका मिळाली याबाबत मला छान वाटतंय”.
पती, मुलीकडून दाद
पुढे कुटुंबाच्या प्रतिसादाबद्दल त्या म्हणाल्या, “कुटुंबाच्या प्रतिक्रिया खूपच छान होत्या. संजय (पती) सोशल मीडियावर फार नाही. तो टीव्हीही फारसा बघत नाही. मी त्याला जेव्हा हे मालिकेचं दाखवलं तेव्हा त्याला खूप छान वाटलं. वेगळी दिसते तू यामध्ये असं त्याने मला सांगितलं. इतकंच त्याने मला सांगितलं. पण त्याला याचं कौतुक नक्कीच आहे”. बाहेरचे प्रेक्षक जेव्हा त्याच्याजवळ कौतुक करतात तेव्हा तो ते आवर्जुन मला सांगतो. एखादी गोष्ट नाही आवडली तर तेही सांगतो”.
आणखी वाचा – “माझे स्तन तिच्याएवढे नाहीत आणि…”, नीना गुप्तांची सुप्रसिद्ध अभिनेत्रीबाबात धक्कादायक वक्तव्य, त्यांनी थेट…
परदेशातच राहते लेक
“माझ्या मुलीलाही माझं कौतुक आहे. ती इथे नसते. आताही आठ दिवसांनी ती परदेशात जाणार आहे. तिला हे बरं वाटलं की, मी गेल्यानंतर तू कामात व्यग्र राहशील. तुझ्याबरोबर माझ्यासारखीच मुलं आहेत. ती तुझी काळजी घेतील याचं तिला बरं वाटलं. माझ्या आईला किंबहुना घरातल्या सगळ्याच मंडळींना माझं कौतुक आहे. मी जेव्हा काम करते तेव्हा त्यांना बरं वाटतं आनंद होतो. कारण खूप वर्ष मी हे काम करते. मला मालिका करायला आवडतात”. सुकन्या त्यांच्या नव्या प्रवासाबाबत बोलताना अगदी भारावून गेल्या होत्या.