मराठी चित्रपटसृष्टीतसह हिंदी चित्रपटातही आपली वेगळी जागा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. २०१७मध्ये त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अजरामर आहेत. त्यांच्या भूमिकेतून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला एक अजरामर ‘ग्लॅमरस आई’ दिली. ९० च्या दशकातील प्रत्येक चित्रपटात नायकाच्या आईच्या भूमिकेत रिमा लागूच दिसायच्या. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून दमदार काम करत त्या आईच्या भूमिकेतून सुपरहिट ठरल्या. त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. (Suhas joshi talk about reema lagoo last wish)
अशीच एक आठवण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी सांगितली. एका कार्यक्रमात त्यांना रिमा लागू यांना एक गोष्ट देता आली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. त्यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात त्यांनी रिमा लागूबद्दल बऱ्याच आठवणी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगत खंत ही व्यक्त केली. याबद्दल बोलताना सुहास जोशी म्हणाल्या, “अगदी शेवट शेवटची गोष्ट मला आठवते आहे. स्वाती, रिमा माझ्याकडे राहायला आल्या होत्या. काही तरी नवीन करू असं बरंच काही सांगत आम्ही गप्पाही मारल्या. रिमा सकाळी उठली आणि मला म्हणाली की तिला ज्वारीची उकड खायची आहे. तिने याबाबत खूप ऐकलं आहे पण कधी खाल्ली नाही. मी त्यासाठी तिला लगेच होकारही दिला पण नेमकं त्याच दिवशी आमच्या घरातलं ज्वारीचं पीठ संपलं होतं”.
पुढे सुहास म्हणाल्या, “मी तिला म्हणाले तुला मी उकड करून देईन पण त्यासाठी तुला माझ्या घरी पुन्हा यावं लागेल. त्यानंतर जे काही घडलं आमची भेट परत होऊच शकली नाही आणि ती गेली. ती गेली त्यादिवशी मला पहिलं रडू आलं ते या गोष्टीचं की मला तिला ज्वारीचं उकड खायला देऊ नाही शकले. अजूनही कधी घरात ज्वारीची उकड केली तर रिमा तुझ्यासाठी गं म्हणून मग मी खायला सुरु करते”, असं म्हणत त्यांनी रिमा यांना ज्वारीचं उकड खायला घालू शकले नाही ही खंत आजही लागून राहिली आहे.
रिमा लागू यांनी ‘कलयुग’ या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्री व आईच्या भूमिका केल्या. पण त्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी नाटक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचे हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’ अशा बऱ्याच नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.