चंदेरी दुनियेच्या झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काऊच. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव आला आहे. पूर्वी अभिनेत्री या प्रसंगांबद्दल व्यक्त होत नव्हत्या. पण आता अभिनेत्री त्यांच्याबाबत घडलेल्या घटना स्वत:हून सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. यात अनेक हिंदीसह मराठी अभिनेत्रींचाही समावेश आहे. पण काहींनी मात्र या गैरप्रकारांना वेळीच रोखलं आहे, यापैकी एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Sonali Kulkarni On Casting Couch)
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘गुलाबजाम’ यांसारख्या अनेक मराठी व ‘सिंघम’, ‘दिल चाहता है’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाबरोबरच सोनाली आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. इतकंच नव्हे तर बिनधास्त व बेधडक स्वभावामुळे ती कायम चर्चेत राहत असते. तसंच ती अनेकदा सामाजिक विषयांवरही व्यक्त होत असते. अशातच तिने कास्टिंग काउचबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – विजयचा GOAT चित्रपट आता ओटीटीवर येण्यास सज्ज, कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार, जाणून घ्या…
सोनालीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात कास्टिंग काऊचबद्दल असं म्हटलं की, “काही नग भेटले. पण मला वाटत आपल्यात तेवढा सावधपणा पाहिजे. जिथे आपण आपलं शोषण करु दिलं नाही पाहिजे. भूमिका तर पाहिजे पण आपण त्याचं काय मोल द्यायला तयार आहोत. याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो की त्यांनी माझं शोषण केलं. पण काहींसाठी ते चालणार असतं. कारण काही झालं तरी मी पुढे जाणार हे त्यांच्यासाठी असतं. हे स्त्री कलाकार किंवा पुरुष कलाकार कुणाच्याही बाबतीत खरं आहे. फक्त याच क्षेत्रात असं नाही कोणत्याही क्षेत्रात हे आहे”.
यापुढे तिने असं म्हटलं की, “आपल्याला या माणसाने असं कसं काय विचारलं याच दु:ख होणार असेल तर त्याला तिथेच नकार देण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. अशा माणसांना मी खूप आत्मविश्वासाने शांत करु शकली आहे. हे चालणार नाही, मी माझी रेषा आहे आणि ही तुम्ही ओलांडू शकत नाही. याबाबतीत मी ठाम राहिली आहे. त्यामुळे माझ्याकडे तक्रारी खूप कमी आहेत. कारण मी माझ्या बाजूने उभी राहिली आहे”. दरम्यान, सोनाली ही केवळ चित्रपटांमधूनच नाही तर ओटीटी विश्वातील अनेक सिरिज व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. लवकरच ती ‘मानवत मर्डर्स’मध्ये झळकणार आहे.