मराठी व हिंदी चित्रपटांमधून आपलं स्वतःचं असं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आजवर त्यांनी ‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘७२ मैल एक प्रवास’ यांसारख्या चित्रपटातून काम केलं आहे. अशातच या मराठमोळ्या अभिनेत्रीने परदेशात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. (Smita Tambe On Award)
स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्मिता तांबे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. लॉस एंजेलिसमधल्या डाऊनटाऊनमध्ये नुकताच हा दिमाखदार सोहळा पार पडला. एकूण १२ विभागांपैकी ‘जोरम’ या चित्रपटाने तब्बल दोन पुरस्कार पटकावले. परदेशात स्मिता तांबे यांच्या चित्रपटाने दणदणीत विजय मिळवला.
या पुरस्काराविषयी स्मिता यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘एका कोरिअन चित्रपटातील अभिनेत्रीला आणि मला असा विभागून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार देण्यात आला. सुंदर हिऱ्यांनी सजलेलं ते मानचिन्ह स्वीकारताना खूप खास वाटत होतं. जागतिक स्तरावर आमचा सिनेमा दाखवणं ही अभिमानाची बाब आहे.’ याबाबतची पोस्ट अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केली आहे, यावेळी पुरस्कार स्वीकारतानाचे काही फोटो व व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत, यावेळी भाषण देत त्या भारावून गेलेल्या दिसल्या. ‘मी. स्मिता, ॲक्ट्रेस फ्रॉम इंडिया’ हे उच्चारताना वेगळीच भावना मनात दाटून आली. जागतिक स्तरावर संपूर्ण आशिया खंडातील चित्रपटांमधून आपली निवड होणं हे मला माझ्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘जोरम’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. देवाशिष माखिजा दिग्दर्शित, झी स्टुडिओची साहाय्यक निर्मिती असलेला ‘जोरम’ हा चित्रपट ८ डिसेंबरला जगभर प्रदर्शित होत आहे. यात मनोज वाजपेयी, स्मिता तांबे-द्विवेदी व तनिष्ठा चॅटर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत.