वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा फॅशनमधील वेगळेपणा संस्कृती तिच्या फॅशन व उत्तम अभिनयासाठी चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा हा हटके लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना तिच्या या नव्या लूकमागील खरी कथा समोर आली आहे. संस्कृती नेहमीच तिच्या कामात किंवा फॅशनमध्ये प्रयोग करताना दिसते. अशातच अभिनेत्रीने तिच्या नव्या लूकसाठी हेअरकट केला आहे. (Sanskruti Balgude Hair Donate)
पहिल्यांदा एवढे छोटे केस तिने कापले असून ती हे केस कॅन्सरग्रस्त रुग्णांना दान करणार आहे. या बद्दल बोलताना संस्कृती म्हणाली की, “नवा हेअरकट करण खरंतर ही खूप धाकधूक होती. मनात कुठेतरी असं सुरु होतं की हे आपल्याला हे झेपणार आहे का?, मी पहिल्यांदा एवढे शॉर्ट केस कापले आहेत पण जेव्हा हे झालं तेव्हा वाटलं की नाही हे छान झालं. मग टीमबरोबर चर्चा करुन अस ठरलं की, यावर एक फोटो शूट करुया कारण ती एक आठवण राहणार आहे. शॉर्ट हेअर खरंच सांभाळण्यासाठी किती सोप्पं आहे हे समजलं याशिवाय मी किती वेगळी दिसत आहे याचासुद्धा आनंद यातून अनुभवयाला मिळत आहे”.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, “खरं सांगायचं तर कॅन्सर पेशंटला केस दान करावे असं माझ्या डोक्यात नव्हतं. केस कापण्याच्या दोन-तीन दिवस आधी मी इन्स्टाग्राम स्क्रोल करत होते आणि तेव्हा मी बघितलं काही मुली त्यांचे केस कापून उरलेले केस हे दान करत होत्या यातून हा विचार माझ्या डोक्यात आला आणि मग आपण आपले केस कॅन्सर पेशंटला दान करावे असे ठरवलं. अगदी ते थोडे असतील पण ते दान करुन यातून काहीतरी घडू शकत म्हणून मी माझे केस दान केले”.
अभिनयाच्या पलिकडे जाऊन अश्या गोष्टी समाजासाठी करणं हा मोठा निर्णय तर नक्कीच आहे. संस्कृतीच्या नव्या लूकबरोबर प्रेक्षक तिच्या या निर्णयाचं देखील तितकच कौतुक करताना दिसत आहेत.