Rupali Bhosle Gets Emotional : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली चारहुन अधिक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अनेकदा मालिकेच्या कथानकावर टीका झाली, मात्र तरीही प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिका संपणार असल्याने कलाकारही भावुक होताना पाहायला मिळत आहेत. विविध माध्यमांद्वारे ही कलाकार मंडळी आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
अशातच या मालिकेतील संजना हे पात्र साकारणाऱ्या रुपाली भोसलेने शेअर केलेली एक स्टोरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील अभिनयाने रुपालीने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुपाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती आयुष्यातील घडामोडीसंबंधीत फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आई कुठे काय करते’मध्ये खलनायिकेची भूमिका साकारुन तिने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
रुपाली भोसलेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक ट्रक दिसत असून काही माणसे ट्रकमध्ये खुर्च्या भरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रुपालीने “समृद्धी घर रिकामं होतंय”, असं कॅप्शन देत त्यापुढे भावुक इमोजी शेअर केल्या आहेत. या मालिकेत अनिरुद्धची गर्लफ्रेंड ते त्याची बायको असा संजनाचा प्रवास रुपाली मार्फत मालिकेत पाहायला मिळाला. अभिनेत्रीच्या नकारात्मक भूमिकेचा जितका राग करण्यात आला तितकंच तिच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं.
रुपाली भोसलेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच नवं घर आणि नवी गाडी खरेदी केली. सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करत असते. आता मालिका संपताच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन भावुक पोस्ट शेअर केली आहे.