Girish Oak On Election : अनेक कलाकार मंडळी सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय प्रश्नांवर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. मतदानाला अवघा एक दिवस उरलं असून या निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख सहा पक्षांची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दिग्गजांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी पार पडताना पाहायला मिळाल्या. अखेर सोमवारी सायंकाळी सहा वाजता या प्रचाराचा शेवट झाला असून आता उद्या म्हणजेच बुधवारी मतदान होणार आहे. तर यंदाच्या मतदानात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे येत्या २३ नोव्हेंबरला समोर येणार आहे.
यंदा निवडणूक प्रचाराला दिग्गज नेत्यांसह कलाकार मंडळीही सहभागी झाली होती. दरम्यान, राजकीय पार्श्वभूमीवर अनेक कलाकार मंडळी आपलं मत मांडताना दिसत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या राजकीय पार्श्वभूमीवरील पोस्ट मतदानाच्या कालावधीत चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मतदारांना दोन ‘भाबडे’ प्रश्न विचारले होते. पक्षांकडून देण्यात येणारी आश्वासनं आणि गाड्यांमध्ये पकडण्यात येणा पैसे याबाबतचे हे दोन प्रश्न होते. यानंतर आता गिरीश ओक यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये या ज्येष्ठ अभिनेत्याला आणखी एक ‘भाबडा’ प्रश्न पडला आहे.
गिरीश यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “मला पडलेला अजून एक ‘भाबडा’ प्रश्न. चित्रपटांना, नाटकांना सेन्सॉर आहे तसं या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही?. अहो सध्या फार पंचाईत होते. मुलांबरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनेलवर ही भाषणं बघताना, ऐकताना. त्या भाषणांमधल्या नको नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्यापेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडंस १३ + १६ + १८ येतं तसं निवडणूक आयोगाने या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का?”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या निर्मात्याची कॉलर पकडण्यावरुन अखेर जेठालालने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “यापुढे मी…”
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “का तर आम्हाला कळलेलंच आहे की कुठले राजकीय ज्येष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात पण, हे मुलांनाही कळायला नको म्हणून हो. एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी”. गिरीश ओक यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाच्या सासऱ्यांची म्हणजेच डॅडींची भूमिका साकारत आहेत.