Nashik Malegaon Rape case : कानाला, मनाला धक्का देणारी एक वाईट घटना कानावर आली आणि प्रत्येकाच्या जीवाची घालमेल वाढली. हो. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन निर्घृण हत्या. ऐकतानाही खूप त्रास होतोय. तर त्या चार वर्षीय चिमुरडीवर आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर काय बेतलं असेल सांगता येणं कठीण. नाशिकच्या मालेगांव येथील डोंगराळे गावांत साडेतीन-चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आणि हत्याही. काही वेळांतच ही बातमी सर्वत्र पसरली आणि सगळीकडे संतापाची लाट उसळली. यानंतर मात्र आरोपीला भर चौकात फाशी द्यावी असा आवाज सगळ्यांनी उठविला. यादरम्यान, मराठमोळ्या अभिनेत्रीनेही इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री रुचिरा जाधवने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आवाज उठविला आहे.
व्हिडीओ शेअर करत रुचिरा म्हणाली, “सोशल मीडियावर जे काही मी पाहतेय. ज्या काही बातम्या, व्हिडीओ येत आहेत. मालेगावमध्ये जे काही घडलंय, त्याबद्दल मी आज बोलतेय. चार वर्षांची मुलगी ती. या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण काहीच करणार नाही तोपर्यंत हे होत राहणार. आता आपण या घटनेबद्दल वाचणार, प्रतिक्रिया देणार, आणि मग हळहळ व्यक्त करणार. बापरे म्हणणार! पण, पुढे काहीच होणार नाही. उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार, तुम्ही तुमचं काम करणार. या गोष्टीचं मूळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काहीच करु शकत नाही. जर या मुलीला न्याय मिळाला नाहीतर एक समाज म्हणून आपण नापास आहोत. पूर्णपणे नापास”.
आणखी वाचा – सिंपल लुक, ना अवाढव्य खर्च; मेघन आणि अनुष्काच्या लग्नाच्या लुकमधील साधेपणाची चर्चा
अभिनेत्री पुढे म्हणाली, “समाजाची मानसिकता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मला सांगा या मुलीने वाईट कपडे घातले होते का? आता कपड्यांना दोष देता येणार नाही. आता काय कराल? चार वर्षांची मुलगी होती ती. आता कोणाला दोष द्याल? प्रत्येकवेळी तेच कारण नसू शकतं. मी हे म्हणणार नाही की जगात जे चालू आहे ते सगळंच चांगलंच सुरु आहे. सगळ्याच मुली बरोबर आहेत असंही मी म्हणणार नाही. पण, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपण प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधलं पाहिजे. मी आज व्यक्त झाले नाही तर एक स्त्री म्हणून माझी मला लाज वाटेल”.
“मला माहिती नाही असं व्यक्त होणं किती योग्य आहे किती अयोग्य. पण नाही. हे फार क्रूर आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ज्या महाराजांच्या भूमीत आपण राहतो. आज तिथे हे सगळं होतंय हे विचित्र आहे. हे जर होत राहिलं तर विनाश फार लांब नाही. अजिबातच लांब नाही. माझी प्रशासनाला, सरकारला विनंती आहे की, प्लीज प्लीज काहीतरी करा. आता न्याय हवाय”, अशी विनंतीही रुचिराने या व्हिडीओद्वारे केली.





