रंग माझा वेगळा मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदेचा लग्नसोहळा गेल्या शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नाची गेल्या आठवड्याभरापासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. रेश्माने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने साजऱ्या केलेल्या केळवणाचे फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना सुखद दिला होता. यानंतर अभिनेत्रीचं दुसरं केळवण तिच्या लाडक्या मैत्रिणी अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे यांनी केलं होतं. हळद, मेहंदी असे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर रेश्माने लग्नगाठ बांधत आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. (Reshma Shinde Gruh Pravesh)
रेश्माच्या लग्नाला मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. श्रीरंग देशमुख, मृणाल देशपांडे, अभिजीत खांडकेकर, पौर्णिमा तळवलकर, हर्षदा खानविलकर, विदिषा म्हसकर, शाल्मली, अनघा अतुल, आशुतोष गोखले, भक्ती देसाई, ऋतुजा कुलकर्णी आदी कलाकार रेश्माच्या लग्नाला हजर होते. त्याचबरोबर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील काही कलाकारांनीदेखील रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो म्हणजे अभिनेत्री सासरी झालेल्या गृहप्रवेशाचा…
आणखी वाचा – 03 December Horoscope : वृषभ राशीच्या लोकांना मंगळवारी मेहनतीमुळे मिळेल सन्मान, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य?
सासरी पार पडलेल्या गृहप्रवेशाची खास झलक रेश्माने तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये रेशमाचे सासरी पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेश्माच्या स्वागतासाठी खास विविध फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. तसंच यावेळी तिचे औक्षणही करण्यात आले. माप ओलांडत रेश्माने सासरच्या घरात प्रवेश केला. यावेळी सासरच्या घरची काही खास माणसं तिच्या स्वागतासाठी उपस्थित होती. हार, फुलं आणि आकर्षक अशा रोषणाईने रेश्माच्या सासरचे घर सजल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रेश्माने मराठी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धतीने लग्न केल्याचे पाहायला मिळाले. सर्वात आधी मराठमोळ्या पद्धतीत लग्न लागतानाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, तिचा नवरा पवनने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व धोतर परिधान केले होते. त्यानंतर लग्न लागताना रेश्मा व पवन यांनी खास दाक्षिणात्य लूक केला होता. या दोघांच्या लूकने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुंदर अशी साऊथ इंडियन साडी, हातात हिरवा चुडा, कानात झुमके या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती.