धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘धर्मवीर-२’ ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘धर्मवीर-२’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच मराठी अभिनेत्री राधिकानेही या चित्रपटाबद्दलची एक खास पोस्ट लिहिली आहे. (Radhika Deshpande on Dharmaveer 2)
राधिकाने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब कल्पवृक्ष, ज्याच्या पारंब्या सर्वत्र पसरल्या, ठाण्यातल्या आनंद दिघे ह्यांनी एका पारंबीचे वटवृक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या एका आदेशावर मावळ्यांनी तलवारीच्या जोरावर शत्रूचा हिशोब करून सुराज्याचा भगवा झेंडा फडकविला. ज्ञानेश्वर माऊलींनी वाणीत अमृताचे शब्दबीजांकुरले, तर वीर सावरकरांनी त्याच शब्दांचे सूर्य करित हिंदुत्वाच्या विचारांची भगवाकार झळाळी पसरवली. भक्ती, शक्ती, चेतना ह्या त्रिवेणी संगमातून ‘धर्मवीर‘ वाहिनी नसानसातून सळसळते. चित्रपट ‘धर्मवीर‘ तुमच्या रक्तात मिसळून हृदयापर्यंत पोहोचला नाही तर मग दोष धर्मवीर पटाधीशाचा नसून तुमच्या दृष्टीचा आहे. हा चित्रपट मुद्देसूद उदाहरणं देत पुढे जातो”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “चित्र’पट’ आत्ताच का मांडला, यामागचा खरा अजेंडा, नेमका सूत्रधार कोण? याचे गणित लावत बसलात तर तुम्ही हिन्दुस्थानात नसून कब्रिस्थानात असून जुने मुर्दे उखाडता आहात. मतदानाची वारी लवकरच येत असताना हा चित्रपट येणे ‘निव्वळ एक योगायोग समजावा‘ इतकी महाराष्ट्रातली जनता भोळी भाबडी नाही. त्यांना या गोष्टी कळतात. चित्रपट पाहून मतपरिवर्तन होऊ शकते हे माझे वय्यक्तित मत जरी असले तरी मी कोणावर लादणार नाही. मात्र त्या मताचे मतपेटीत परिणाम दिसतील असे अलीकडील इतिहास बघता कोण ठामेठोकपणे सांगू शकेल बरे? मी तर म्हणेन किमान कोणाला आपले अमूल्य मत ‘देऊ नये‘ हे कळले तरी पुष्कळ आहे. जनता एक वेळ भोळी भाबडी असली तरी चालते पण मूर्ख नसावी. मत द्या, मतं मांडा, पंचेंद्रिय खुली ठेवून”.
आणखी वाचा – “तर त्याला मी सोलून काढलं असतं”, अभिजीत बिचूकलेंना पॅडी कांबळेंनी सुनावलं, म्हणाले, “त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ नसून…”
यापुढे राधिकाने असं म्हटलं आहे की, “चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, तो देखणा, दिमाखदार आहे. प्रत्येक फ्रेम मधे माझे अनेक कलाकार मित्र मंडळी दिसतात. तारांकित, ग्रहांकित कलाकारांची मांदियाळी मज्जा आणते. संवाद, चित्र रेखाटण ‘तरडे पॅटर्न!‘. चित्रपटाची शेवटची फ्रेम म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’. तर कुठे गेले मरहट्टे? चित्रपटगृहात… कारण ‘देश की बात’ जिथे होणार तिथे ‘मरहट्टे अग्रस्थानी असणार”