बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा वादग्रस्त उल्लेख केला आणि यामुळे नवा वाद निर्माण झाला. यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खेद व्यक्त केला. तसंच आणि सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही तिने या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. (Prajakta Mali meet Devendra Fadnavis)
अशातच अभिनेत्रीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. ‘महाराष्ट्र डीजीपीआर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या भेटीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता तिने कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोपवले. २९ डिसेंबरला ती मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला सागर येथे जाऊन ती भेटली. यावेळी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले त्या तिने म्हटले आहे की, सुरेश धस यांना समज द्यावी तसेच सोशल मीडियावर विनाकारण ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी विनंती केली.
तसंच तिच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबाबतची माहिती नागरिकांना दिली आहे. ‘महाराष्ट्र डीजीपीआर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबद्दल असं सांगण्यात आले आहे की, “प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले”.
आणखी वाचा – 30 December Horoscope : सोमवारी तुमच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होणार, प्रगतीच्या संधी, जाणून घ्या…
दरम्यान, प्राजक्ता माळी प्रकरणानंतर मराठी कलाविश्वातून अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री विशाखा सुभेदार, लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, तसंच निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्तासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला आहे. “राज्यातील प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेते यांचा विकृतीकडे प्रवास चालू झाला आहे. महाराष्ट्राने प्राजक्ता माळीसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे” असे म्हणत त्यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे.