मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने अवघ्या कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सौंदर्यवती स्पर्धेतून पुढे आलेल्या प्रार्थनाने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हाट्सॲप लग्न’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र, लग्नानंतर प्रार्थना चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. पुढे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. मात्र, चाहते व प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत. (Prarthana Behere talk about her Father)
अभिनयाबरोबर प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटोज आणि व्हिडिओज तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगताना दिसणार आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रार्थनाने नुकतेच दोन व्हिडिओ शेअर केले. त्यातील एका व्हिडिओत तिने तिच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना तिच्या बाबांबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. त्याचबरोबर तिच्या आयुष्यात गणरायाचे काय स्थान आहे, हे देखील सांगितलं आहे. हा प्रसंग सांगताना अभिनेत्री प्रचंड भावुक झाली होती.
हे सांगताना प्रार्थना यावेळी म्हणाली की, “मी तेव्हा कॉलेजमध्ये असेन. त्यादिवशी संध्याकाळची वेळ होती. बाबा थोडेसे थकलेले वाटत होते, काही कळत नव्हतं. पण मी क्लासला जाण्यासाठी तयार होताच अचानक बोलता बोलता बाबांनी डोळे वर केले आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. मी लगेच आईला सांगितलं, तेव्हा आई त्यांना विचारत होती, ‘अहो काय झालं?.’ मी लगेच डॉक्टरांना शोधायला गेले, तर रविवार असल्यामुळे डॉक्टर नव्हते. खाली एक कंपाउंडर राहायचा त्याला बघायला गेले तर तोही नव्हता. मग मी ‘काय करू, काय करू’ असा विचार करत होते. त्याचवेळेस आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी होती, जी डॉक्टरची प्रॅक्टिस करत होती. तिने चेक केलं आणि म्हणाली, ‘काकांची नस मिळत नाही, तातडीने अॅम्बुलन्स बोलवावी लागेल.'”
हे देखील वाचा – Video : ‘आई कुठे काय करते’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणातल्या गावी, विहिरीतील पाणी काढतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “या पाण्याची चव…”
“मी बघितलं तर बाबा अजूनही त्याच स्थितीत होते, १०-१५ मिनिटे झाले होते. मी प्रचंड घाबरले होते, मला सुचेना काय करू. नंतर मी थेट मंदिरात गेली आणि जोरजोरात अथर्वशीर्ष म्हणू लागली. मी बाप्पाला सांगितलं, जोपर्यंत माझ्या बाबांना बरं नाही वाटत तोपर्यंत मी हे म्हणत राहणार. पुढे १०-१५ मिनिटांनी माझ्या एका मैत्रिणीनं मला सांगितलं, की तुझ्या बाबांना शुद्ध आली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर मला जाणीव झाली की, माझा श्वास प्रचंड चढला होता आणि मला काही कळलं नव्हतं. मला जोरात खोकला आला, १५ मिनिटे मी उलट्या करत होते. तेव्हा आई मला म्हणाली की, तू स्वतःला सांभाळ आणि ती बाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेली होती. पण या सगळ्यात मला एका गोष्टीची जाणीव झाली की, माझा गणपती बाप्पा माझ्याबरोबर कायम आहे. ते क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.”, असं प्रार्थनाने यावेळी सांगितलं. हा प्रसंग सांगताना प्रार्थनाला अश्रू अनावर झाले होते.
हे देखील वाचा – “साडेतीन लिटर रक्ताच्या उलट्या झाल्या अन्…”, आदेश बांदेकरांनी सांगितलं त्यादिवशी नेमकं काय घडलं?, म्हणाले, “डोळे बंद झाले आणि…”
छोट्या पडद्यावर कमबॅक केल्यानंतर प्रार्थना आता मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रार्थनाकडे अनेक चित्रपटांची रांग लागली असून संजय जाधव दिग्दर्शित आगामी चित्रपट व ‘आंबट शौकीन’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.