जगभरात सर्वत्र महा कुंभमेळा २०१५ ची क्रेझ असल्याचे पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे हा महा कुंभमेळा संपन्न होत असून येथे करोडोंच्या संख्येने भाविक हजेरी लावताना दिसतात. केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या महा कुंभमेळ्याला अनेकांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. यावेळी परदेशी पाहुणेही खास भेट देताना दिसले. सर्व सामान्यांची गर्दी तर नजर न जाईल इथवर होती. केवळ सर्वसामान्यास नव्हे तर यंदाच्या या महा कुंभमेळ्याला कलाकारांनी हजेरी पाहायला मिळाली. १४४ वर्षांनी आलेल्या या महा कुंभमेळ्याला याची देही याची डोळा पाहावे असे प्रत्येकाचे स्वप्न होते आणि आता हे स्वप्न आपल्यातल्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं पूर्ण झालं असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर थेट महा कुंभमेळ्याची झलक शेअर करत अभिनेत्रीने या महा कुंभमेळ्याचा आनंद घेतला असल्याचं सांगितलं आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी. (Maha Khumbh Mela 2025)
प्राजक्तांने आजवर तिच्या अभिनयाने सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड केले. मालिका, चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण केलं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याने या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक चित्रपटांमधून तिने अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या. अभिनयात यश मिळवत असतानाच तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड देखील सुरु केला आणि याचीही सर्वत्र चर्चा झाली. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य याशिवाय निर्माती अशा अनेक भूमिका प्राजक्ता पार पाडतेय. सोशल मीडियावर ती नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच सध्या प्राजक्ताने महा कुंभमेळ्याला हजेरी लावली असल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
या व्हिडीओमध्ये महाकुंभ मेळ्यात फिरताना प्राजक्ता माळी दिसत आहे. तसंच ती पवित्र स्नान करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे की, “तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पाहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले.(काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणार अद्भुत अनुभव आहे”.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, प्राजक्ताच्या अभिनीत व निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाची विशेष चर्च रंगलेली पाहायला मिळाली. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला. या चित्रपटानंतर आता लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ असं प्राजक्ता नव्या चित्रपटाचं नाव असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.