Prajakta Mali Birthday : छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांशी आपली रेशीमगाठ जुळवत त्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आजवर मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व उत्तम सूत्रसंचालनाद्वारे चर्चेत असणारी अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियाद्वारे प्राजक्ता नेहमीच तिचे हटके व स्टायलिश फोटो शेअर करत असते. अशातच तिने काल आपला एक फोटो पोस्ट करत “उद्याचा दिवस खास आहे” असं म्हटलं होतं. तेव्हापासून सर्वांना आजच्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधत प्राजक्ताने तिच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. (Prajakta Mali Phulvanti Look)
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘फुलवंती’ चित्रपटाचा एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओमधून ‘फुलवंती’चा पहिला लूक समोर आला आहे. ही ‘फुलवंती’ आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. या लूकमध्ये प्राजक्ताचा राजेशाही थाट असलेला भरजरी साडीतला अस्सल मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “१ ॲाक्टोबर २०२४ पासून तुमच्या मनावर राज्य करायला येतेय, ‘फुलवंती’. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. पॅनोरामा स्टुडिओ सादर करीत आहेत. मंगेश पवार ॲंड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित; पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय. ‘फुलवंती’” असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या आईसह काही कागदपत्रांवर सही कारतानाचे फोटो शेअर केले होते. प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत “२३ एप्रिल २०२४ रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी अजिबात नाही. या क्षणी माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे”. असं म्हटलं होतं. यावेळी तिने तिच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाची घोषणा केली होती. अशातच आज प्राजक्ताने तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत तिच्या आगामी अभिनीत व निर्मिती असलेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटामधील पहिला लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
प्राजक्ताच्या या नवीन चित्रपटाच्या लूकवर मराठी कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, विकास पाटील, प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या कलाकारांनी तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्राजक्ताच्या अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीचे या चित्रपटानिमित्त कौतुक केले आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.