Phullwanti Movie : छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांशी आपली रेशीमगाठ जुळवत त्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आजवर मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या भव्य चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये आतुरता होती. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार असल्याचे या टीझरमधून वाटत आहे. (Phullwanti Movie Teaser)
पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली अशी ही ‘फुलवंती’ कलाकृती आहे. समोर आलेल्या या टीझरमध्ये फुलवंतीची लोकप्रियता किती आहे. त्याचा एक अंदाज येतोय. कोणत्याही समारंभात तिचा एक नाच व्हावा यासाठी सगळेच कशी आशा करत असतात. तर दुसरीकडे व्यकंट शास्त्री हे कशा प्रकारे फुलवंतीला भेटतात आणि त्यांच्यातील भेट या सगळ्याची एक झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.
‘फुलवंती’च्या समोर आलेल्या टीझरमधून या चित्रपटात अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अनेक कलाकारही या टीझरमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसाद ओक, चेतना भट, वनिता खरात आदी कलाकार या टीझरमध्ये पहायला मिळत आहेत. याशिवाय पृथ्विक प्रताप, समीर चौघुले, गौरव मोरे, रोहित माने हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तसंच वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितिज दाते, ऋषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, दीप्ती लेले या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत.
दरम्यान, मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी ‘फुलवंती’ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. संगीताची धूरा अविनाश- विश्वजीत यांनी सांभाळली आहे. तसंच कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ११ ऑक्टोबरला ‘फुलवंती’ हा चित्रपट येणार असून प्राजक्ताचे अनेक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.