Prajakta Mali Business : अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनय, डान्सबरोबरच निर्माती, उद्योजिका म्हणून प्रसिद्ध आहे. प्राजक्ताने उद्योगविश्वात पाऊल टाकलं असून एक नव्हे तर दोन व्यवसाय ती सांभाळत आहे. प्राजक्तकुंज हे कर्जत येथील फार्महाउस आणि प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड ती सांभाळत आहे. २०२३ मध्ये प्राजक्ताने प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. आणि अगदी कमी वेळात तिच्या या ज्वेलरी ब्रँडला भरभरुन प्रतिसाद मिळाला. प्राजक्तराजच्या दागिन्यांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर भरभरुन प्रेम मिळालं. यानंतर आता प्राजक्ताने तिच्या या ज्वेलरी ब्रँडबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याआधीच तिने तिच्या ब्रँडबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या या ज्वेलरी ब्रँडचे ‘प्राजक्तराज’ हे नाव बदलून ‘प्राजक्तसाज’ हे नाव दिलं असल्याची मोठी घोषणा केली आहे. आणि यापुढे प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडला ‘प्राजक्तसाज’ या नावाने ओळखलं जाईल असंही तिने म्हटलं आहे. हा इतका मोठा निर्णय तिने का घेतला याचं कारण देत तिने व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
प्राजक्ता माळी व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “नमस्कार. आजच्या लाइव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लाइव्ह अतिशय स्पेशल आणि एका स्पेशल कारणासाठी आहे. अर्थात हे माझ्या आणि आपल्या ब्रँडसंदर्भात आहे. आता नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे ‘प्राजक्तसाज – Reviving Maharashtra’s Legacy’. मला माहितीये ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तीन-सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरु केला होता. तेव्हा मला बिझनेसविषयी काहीच कल्पना नव्हती. फक्त यामागे एकच विचार होता की, आपले मराठमोळे, पारंपरिक दागिने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणायचे. अर्थात तीन वर्षांपूर्वी मला बिझनेसमधलं इतकं काहीच कळत नव्हतं. पण, आता हा बिझनेस इतका मोठा होईल याची मला खरंच कल्पना नव्हती”.
आणखी वाचा – दोन वर्षांपासून सुप्रसिद्ध गायिकेचा आवाज ऐकलाच नाही, ‘या’ गंभीर आजाराने आहे त्रस्त, ऐकूच येत नाही आणि…
प्राजक्ता पुढे म्हणाली, “आता दागिन्यांचा जेवढा खप आपल्या महाराष्ट्रात आहे तेवढाच खप भारतात आणि संपूर्ण जगात आहे. ग्राहकांच्या अतिशय उत्तम प्रतिक्रिया येत आहे. पण, अनेकदा शिपिंगदरम्यान खूप अडथळे आले. म्हणून ठरवलं यातून आता मार्ग काढायचा. यातूनच ‘प्राजक्तसाज – Reviving Maharashtra’s Legacy’ हे नाव जन्माला आलेलं आहे. आम्हाला लोगो सुद्धा बदलायचा होता पण, आता जो आहे त्याच्यापेक्षा सुंदर लोगो आम्हाला सापडला नाही. त्यामुळे लोगो सेम राहील. लोगोवर माझ्याच हस्ताक्षरात नाव लिहिलेलं आहे”.
“याशिवाय मला टॅगलाइनमध्ये ‘महाराष्ट्र’ शब्द हवा होता. अर्थात यामागे अजूनही बरीच कारणं आहेत. जी मी तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही… पण, माझा विश्वास आहे की, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता या क्षणापासून तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला नावात बदल झालेला दिसेल, तुम्ही तुमचं प्रेम आणि पाठिबा कायम ठेवा… खूप खूप धन्यवाद”, असं प्राजक्ताने सांगितलं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “होय…आजपासून आपण “PrajaktSaj” Reviving Maharashtra’s Legacy. Brand name change. Change is a must thing. अलंकार, भावना, प्रेम तेच, नाव नवे”.





