अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या नात्याची जाहीर कबुली देण्याआधी तिच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींसह अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं. मात्र आपण फक्त मित्र आहोत असं म्हणत तिने नेहमीच त्या चर्चांना पूर्णविराम लावला. यानंतर थेट होणाऱ्या नव्याबरोबर रिंग फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो अभिनेत्रीने शेअर करत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या व सिद्धेशमध्ये असणाऱ्या नात्याबद्दलची खास गोष्ट सांगितली. (Pooja Sawant On Her Past)
अभिनेत्रीने नुकतीच रेडिओ सिटी मराठी या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीने आपला भूतकाळ सिद्धेशबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला, एक पार्टनर म्हणून आयुष्यात पुढे जाताना त्याला आपल्याबद्दल सगळं सांगणं महत्त्वाचं होतं,असंही ती म्हणाली. पूजा म्हणाली, ‘भूतकाळ शेअर करण्याआधी एकमेकांवर विश्वास असावा. जर तुमचा विश्वास घट्ट आणि पक्का असेल तरच भूतकाळ शेअर करावा” असंही ती म्हणाली.
अभिनेत्री म्हणाली, “आपण आपला भूतकाळ मागे ठेवून नवीन आयुष्य सुरु करत असतो. तुम्हाला माहीत नसतं की कधी, केव्हा, कसा तुमचा भूतकाळ तुमच्यासमोर येईल. माझ्याही घरी असं होतं की जे आहे ते आधी बोलून घे, मग निर्णय घ्या. पण सिद्धेशला माझा भूतकाळ जाणून घेण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. तो म्हणाला की, मला तू हवी आहेस, याच्यापुढचं आयुष्य मला तुझ्याबरोबर घालवायचं आहे. मला तुझ्या भूतकाळात काहीही इंटरेस्ट नाही आहे. मला काहीही ऐकायचं नाही तू मला सांगूही नकोस. मी त्याला बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मला म्हणाला की, हे सगळं कसं हाताळायचं मला माहीत आहे” असंही ती म्हणाली.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “भूतकाळ सांगणं महत्वाचं आहे पण समोरचा तुमच्यावर तुमच्या भूतकाळापेक्षाही जास्त प्रेम करत असेल तर नाही सांगितलात तर काही फरक पडत नाही. तुम्ही त्या माणसाला तेव्हाच ओळखू शकता जेव्हा तो व्यक्ती सगळं बाजूला ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुमच्यावर प्रेम करतो. मला सुरुवातीपासूनच त्याला सगळं सांगायचं होतं” असंही अभिनेत्री म्हणाली.