नव्या पिढीतील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही काही दिवसांपासून एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आहे. बनावट व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमातून प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच (एआय) चा वापर करून कलाकारांचे बनावट व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार समोर आले आहेत. रश्मिका पाठोपाठ कतरीना कैफ, सारा तेंडुलकर, काजोल देवगण या अभिनेत्रीही डीपफेक व्हिडिओच्या शिकार बनल्या. (Rashmika Mandanna Deepfake Video)
रश्मिकाला हा अनुभव येताच खळबळ उडाली असून, तिने स्वत: हा प्रकार भीतीदायक असल्याची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत सोशल मीडियावरून पोस्टही शेअर केली होती. शिवाय या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली. देशात डीपफेक व्हिडिओची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दरम्यान, पोलीस व प्रशासनही सक्रिय झाले असून अशा प्रकरणांचा कडक तपास केला जात असल्याचं समोर आलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ प्रदर्शित झाल्यापासून त्याची बरीच चर्चा होत आहे. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबत खुलासा करत सांगितले की, ‘त्यांना रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओशी संबंधित प्रकरणाच्या तपासात आवश्यक पुरावे सापडले आहेत आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे याची पुष्टी केली जात आहे’. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “तांत्रिक अधिकारी सर्व आयपी पत्ते शोधत आहेत. जिथून व्हिडिओ अपलोड करण्यात आला त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न मिळालेल्या पुराव्यांनुसार सुरु आहे”, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
तर, पोलिस उपायुक्त (IFSO, स्पेशल सेल) हेमंत तिवारी म्हणाले की, “त्यांच्याकडे आवश्यक लीड्स मिळाले आहेत आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल”. यावरून लवकरच रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओच्या आरोपीला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.