मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नीना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट अन् मालिका केल्या आहेत आणि त्यांच्या या भूमिका गाजल्यादेखील आहेत. आशयघन, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या आणि अभिनेत्री म्हणून कस लावणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनात रूजवल्या. अभिनयासह त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपल्या कामाबरोबरच फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Neena Kulkarni Death Rumors)
अभिनेत्री नीना कुळकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा असून चाहतावर्गामध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्याचे त्यांनी सांगितले. नीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही खळबळजनक माहिती दिली आहे. नुकतीच एका युट्यूब चॅनेलवरुन नीना यांच्या मृत्यूची बातमी शेअर करण्यात आली होती. यामुळे अनेक अफवा पसरल्या गेल्या. त्यामुळे आता या सर्व अफवांवर स्वत: नीना यांनी पोस्ट केली आहे आणि खोट्या बातम्यांचे खंडन केलं आहे. तसंच यावर सर्वांना विश्वास न ठेवण्याचे आवाहनदेखील केले आहे.
आणखी वाचा – Video : अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, शेअर केला खास व्हिडीओ, कौतुकाचा वर्षाव
नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबद्दलचे पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्या मृत्यूविषयी खोटी बातमी पसरवली जाते आहे. मी जिवंत आहे आणि स्वस्थ आहे. देवाच्या कृपेने मी कामामध्ये व्यग्र आहे. कृपया अशा अफवांकडे दूर्लक्ष करा आणि या अफवांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळो”. या पोस्टद्वारे अभिनेत्री नीना कुळकर्णी या जिवंत असून त्यांनी स्वत:च्या निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सोशल मीडियाच्या या काळात कुणाबद्दलच्या अफवा अगदी सहज पसरल्या जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सेलिब्रिटींचे आयुष्य तर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतेच. अनेकदा या कलाकारांबाबतच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि सामान्य प्रेक्षक त्यावर शहानिशा न करता विश्वासही ठेवतात. असाच काहीसा प्रकार नीना यांच्याबाबत घडला आहे. पण त्यांनी स्वत: याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.