मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण मृणाल यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मृणाल यांना मातृशोक झाला आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Mrinal Kulkarni Mother Passed Away)
डॉ. वीणा देव लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यावर सध्या संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आईच्या निधनानंतर मुलगी मृणाल यांनी दु:खद पोस्ट शेअर केली आहे. फेसबुकवर भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “खरंतर आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी-अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो.
आणखी वाचा – ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर, दिवाळी नक्की कधी?, देशभरात कोणत्या राज्यात कधी होणार सेलिब्रेशन?, जाणून घ्या…
यापुढे मृणाल यांनी असं म्हटलं आहे की, “आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!” मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त करत वीणा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी तसेच साहित्यिक व मृणाल यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त करत वीणा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आणखी वाचा – 30 October Horoscope : शुभ योगामुळे मेष, कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या…
दरम्यान, मृणाल कुलकर्णी यांच्या आई वीणा देव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालयात त्यांनी तब्बल ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. वीणा देव यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच यामुळे साहित्यविश्वही हळहळले आहे.