मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री कविता लाड – मेढेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रंगभूमीवर सक्रिय असणारी ही अभिनेत्री सध्या मालिकाविश्वात सक्रिय आहे. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ती भुवनेश्वरीच्या भूमिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ‘झी नाट्य गौरव २०२४’च्या पुरस्कार सोहळ्याला कविता लाड यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. (Kavita Lad Incident)
हा किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “नाटक ही माझी सगळ्यात आवडती कला आहे. मला अभिनयाची गोडी ही रंगभूमीवर लागली. मधल्या काळात मी माझ्या पहिल्या मुलाच्या म्हणजेच ईशानच्या वेळेस गरोदर होते तेव्हा मी नाटकात काम न करण्याचा निर्णय घेतला. नाटकासाठी प्रयोगांचे दौरे होतात, आणि त्यादरम्यान जर माझ्या बाळाला बरं नसेल तर मी कसं करु हा प्रश्न होता. शुटिंगचं पुढे-मागे होऊ शकतं, पण प्रयोगाबाबत असं होऊ शकणार नाही. कोणतीही एक गोष्ट करावी पण ती लक्ष केंद्रित करुन करावी, असं माझं मत आहे. म्हणून मी नाटकाकडे पूर्णतः लक्ष केंद्रित केलं. आणि मी मातृत्व अनुभवण्यासाठी पूर्णतः ब्रेक घेतला”.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, “त्यावेळी मी ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकात काम करायचे तेव्हा मी नाटकाचे निर्माते सुधीर भट यांना नाटक सोडणार असल्याबाबत सांगितलं. तरी मी तीन, चार महिन्यापर्यंत काम केलं. पाचव्या महिन्यात मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ‘एका लग्नाची गोष्ट’चा शेवटचा प्रयोग करायचं मी ठरवलं. पुणे येथे चिंचवडला तो प्रयोग होता. पाचवा महिना लागला होता, त्यामुळे नको वाटत होतं, काम थांबवून आराम करावा असं वाटलं. त्या प्रयोगादरम्यान तिसरी घंटा झाली. एंट्री होण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला, आज मी जी एंट्री घेतेय ती माझी शेवटची एंट्री आहे. यानंतर मी कधी पुन्हा रंगभूमीवर येईन हे मला माहित नव्हतं. पुढचा काळ मला माहित नव्हता. मी एंट्री घेऊन पहिलं वाक्य म्हटलं आणि प्रत्येक वाक्यानंतर मला असं वाटत होतं की, मी हे शेवटचं वाक्य बोलत आहे. मला नाटकातून सुट्टी हवी होती, विश्रांती हवी होती. नाटक संपेपर्यंत माझ्याबरोबरच्या सगळ्या मंडळींना हे जाणवलं की हा माझा शेवटचा प्रयोग आहे”.
रंगमंचावरील कमबॅकबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “नाटक जेव्हा संपलं आणि पडदा पडला. तेव्हा मला खूप रडू आलं. ते रडू नेमकं कशासाठी हे देखील मला कळत नव्हतं. एका चांगल्या गोष्टीसाठी मी नाटक थांबवत होते, त्यामुळे तसं वाईट वाटण्याचं काही कारणही नव्हतं. पण त्यावेळेस मला खूप रडू आलं. आणि त्यानंतर आता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा पहिला प्रयोग. अनेक वर्षांनी मी मनी म्हणून एंट्री घेणार होते. प्रेक्षकांमधून ती एंट्री होती. छातीत धडधडत होतं. भीती वाटत होती. लोकांच्या प्रतिसादाचीही भीती वाटत होती. आपल्यावरील या प्रेक्षकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ना याचीही भीती वाटत होती. तो पहिला प्रयोग शिवाजी मंदीरला होता. प्रेक्षकांमधून मी एंट्री घेतली आणि त्या क्षणाला मला असं वाटलं की, हा सर्व प्रेक्षकवर्ग माझ्या बाजूने आहे. त्यांना मला बघायचं होतं असं वाटलं. अजूनही ते आठवलं की भरुन येतं. मी खूप खुश आहे की, मला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायला मिळतंय, आणि असंच शेवटपर्यंत काम करत राहीन”.