‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून ‘कोकण कोहिनूर’ म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये अनेक पात्रांमध्ये विनोदाचे नवे रंग भरले. त्याने साकरलेली अनेक पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहण्यासारखी आहेत. विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा हा कलाकार उत्तम कवितादेखील सादर करतो.
टीव्हीचा छोटा पडदा असो, रंगभूमी असो, वा चित्रपटाची 70 mm स्क्रीन असो ओंकारने त्याच्या अभिनयाने मनोरंजनाच्या या तीनही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ओंकारच्या अभिनयाचे तर लाखों चाहते आहेतच पण त्याच्या कवितांचादेखील एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ओंकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये ‘तू दूर का?’ ही कविता सादर केली होती. त्यावेळी त्याच्या कवितेला परीक्षकांसह चाहत्यांनीदेखील चांगलेच डोक्यावर घेतले होते. अशातच आता पुन्हा एकदा ओंकारने ही कविता सादर केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळ्यात ओंकारने त्याची ‘तू दूर का?’ ही कविता सादर केली आणि उपस्थितांसह साऱ्यांनाच गहिवरुन आले. ओंकार भोजने सध्या महेश मांजरेकर निर्मित ‘करून गेलो गाव’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. याच नाटकातील काही भाग ओंकार व भाऊं कदम यांनी झी नाट्य गौरव’मध्ये सादर केला. तेव्हा ओंकारने ‘तू दूर का?, मी असा मजबूर का?’ ही कविता सादर केली.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या कवितेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ओंकार भोजने लवकरच डॉ. निलेश साबळे व भाऊ कद यांच्याबरोबर हसताय ना? हसायलाच पाहिजे या शोद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याचया या नवीन् शोविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.