मालिकाविश्वात खलनायिकेच्या भूमिकेतून समोर आलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री कल्याणी चौधरी सोनोने. ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेलं पुष्पा हे खलनायिकेचं पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याशिवाय कल्याणी हिने ‘मनं झालं बाजींद’, ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नवरात्रीनिमित्त सध्या कल्याणी सोशल मीडियावरून स्पेशल पोस्ट शेअर करत आहे. काल केलेल्या पोस्टमधून कल्याणीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका मोठ्या संकटाबाबत भाष्य केलं. (kalyani nandkishor shared life difficult time)
कल्याणी नंदकिशोर यांनी नवरात्रीचे औचित्य साधत समाजातील प्रतिष्ठित महिलांना सन्मान देऊन त्यांच्याबद्दलच्या खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट करताना तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका कठीण प्रसंगाबाबतही भाष्य केलं आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा या पोस्टकडे वळल्या आहेत. कल्याणीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटलं आहे की, “मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच ‘झी मराठी’वरील “लागिरं झालं जी” मधील आज्याची मामी, “मन झालं बाजिंदं” मधील गुली मावशी, ‘कलर्स मराठी’वरील “राजा राणी ची गं जोडी” मधील पंजाबरावची बायको कल्याणीबाई आणि ‘सन मराठी’वरील “शाब्बास सूनबाई” मधील ईश्वरी”.
पुढे तिने लिहिलंय, “२७ नोव्हेंबर २०१४ ला खुशीचा जन्म झाला आणि साधारण १५ दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे तपासण्यामधुन समजलं”.
“अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल. आज खुशी १० वर्षांची झाली आहे. या १० वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडली आहे आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे.”
“आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत”, असे म्हणत कल्याणी नंदकिशोर हिने पोस्ट शेअर केली आहे.