सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची. नुकताच अनंत व राधिका यांचा संगीत सोहळा अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळींनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले. सोशल मीडियावर तर त्यांच्या या शाही लग्नसोहळ्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संगीत सोहळ्यात परदेशी पाहुण्याने धुमाकूळ घातला आहे. (Gauri Kulkarni On Anant Ambani Wedding)
पॉप स्टार जस्टिन बीबरने या लग्नात त्याच्या कलेने साऱ्यांची मन जिंकली. जस्टिनच्या भारतीय चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या सोहळ्यात परफॉर्मन्स सादर केल्यानंतर तो तातडीने मियामीला रवाना झाला. जस्टिनने या कार्यक्रमासाठी घेतलेल्या मानधनाची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी जस्टिनने घेतलेल्या माधनावरुन आता मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिनने त्याच्या अनेक हिट गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी त्याने तगडे मानधन घेतल्याची चर्चा आहे.
यावर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. गौरीने या पोस्टद्वारे असे म्हटले आहे की, “माझ्या २९ रुपयांच्या रिचार्जचे पैसे जस्टिन बीबरच्या खिशात गेले”. यासह कॅप्शन देत तिने असे म्हटले की, “जस्ट-इन तुझ्या ही गोष्ट लक्षात आली नसेल जस्टिन बीबर. पण आम्हाला सगळं कळतं”. तिने या पोस्टसाठी #ambaniwedding असा हॅशटॅगही वापरला आहे.
सध्या अंबानींच्या घरात अनंत-राधिकाचे लग्नाआधीचे विधी पार पडत असतानाच जिओचे मोबाइल रिचार्ज सुद्धा महागले आहेत. त्यामुळे लेकाच्या लग्नासाठी अंबानींनी रिचार्जचे दर वाढवलेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहेत. तर, अनेक क्रिएटर्सनी यावर मीम्स देखील बनवले आहेत. येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही लग्नाला बॉलीवूड कलाकारांसह अनेक परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.