आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणजे अंकुश चौधरी. आजही अंकुश अनेक तरुणीच्या हृदयावर राज्य करतो. आजवर आपल्या दमदार अभिनयाने त्याने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नाटक, चित्रपट गाजवत असलेला अंकुश अभिनेत्री दीपा परब हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकला. नाटकाच्या तालमी करतानाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अंकुश-दीपा हे दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात आणि सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दीपा अंकुशबद्दलच्या अनेक पोस्ट तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. (Deepa Chaudhari shared Ankush Wax Statue Photo)
अशातच दीपाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दीपाने अंकुशच्या मेणाच्या पुतळ्यावबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटो खाली तिने ‘अभिमानाचा क्षण’ असं म्हटलं आहे. या फोटोमधील अंकुशचा हा मेणाच्या पुतळा त्याच्या ‘दुनियादारी’ चित्रपटातील भूमिकेचा आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटांत अंकुशचा लूक हा लाल शर्ट व त्यावर पांढऱ्या रंगाचा जॅकेट आणि त्यावर पांढरी पॅंट असा होता. याच लूकमधील हा पुतळा आहे. देवगड येथे उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा उभारण्यात आला असून या म्युझियमचे नाव ‘सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम’ असं आहे.
लंडनमधील मादाम तुसादच्या धर्तीवर देवगड येथे उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ठिकाणी आतापर्यंत शंभराहून अधिक पुतळे साकारण्यात आले आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कपिल देव, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे लक्षवेधी ठरले आहेत. देवगड येथील वॅक्स म्युझियम येथे काही वर्षांपूर्वी वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी अंकुशचा पुतळा बनवला होता.
आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन बोलले चुकीचं मराठी, गायकाने दाखवून दिली चूक, माफी मागत पुन्हा मराठी बोलले आणि…
दरम्यान, दीपाने अंकुशच्या मेणाच्या पुतळ्याबरोबर काढलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे या फोटोला दाद दिली आहे. “खरा सुपरस्टार आमचा अंकुश चौधरी”, “अभिनंदन”, “गौरवाचा व अभिमानाचा क्षण” आणि “अभिमान वाटतो” अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी या फोटोचे कौतुक केलं आहे.