अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी घोषणा केली आहे. भाग्यश्रीने दीड वर्षांपूर्वी मेकअप, डिझाइनर विजय पालांडे याच्याशी साखरपुडा समारंभ उरकला होता. विजय व भाग्यश्री बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अशातच आता दोघेही वेगळे झाले असून साखरपुडा मोडला असल्याचं तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली. भाग्यश्रीने ही बातमी सोशल मीडियावरुन शेअर करताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. (Bhagyashree Mote Troll)
“नमस्कार मित्रांनो, एकमेकांसह राहण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर विजय आणि मी आमच्या वैयक्तिक व चांगल्या कारणांसाठी जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत हे सांगण्यासाठी मी पोस्ट करत आहे. आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद”, असं म्हणत तिने विजय व ती वेगळी झाली असल्याची पोस्ट शेअर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भाग्यश्रीने चाहत्यांना साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. यानंतर आता भाग्यश्री व विजय वेगळे होणार असल्याचं कळताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.
भाग्यश्रीने ही पोस्ट करताच अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने “तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स सोशल मीडियावर का जगजाहीर करता”, असा प्रश्न विचारला आहे. तर घटस्फोटाच्या घटना वाढल्याने अनेकांनी यावरूनही कमेंट केल्या आहेत. “असं खरंतर काय नवीन नाही, तुम्ही तसं पण बॉलिवूड आणि मराठीमध्ये हा ट्रेण्डच केला आहे”, “पूर्ण पानभर पेपर जाहिरात देऊन टाका. ढोंगीपणाचीपण सीमा असते”, “खासगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता”, “अलीकडे घटस्फोटाचा ट्रेंड सुरु आहे. लोकांना हे का कळत नाही की ते सोबती नाहीत. अलीकडे लग्नाला विनोद बनवलं जात आहे”, अशा कमेंट करत चांगलंच ट्रोल केलं आहे.

भाग्यश्री मोटे व विजय पालांडेचा साखरपुडा ९ ऑक्टोबरला पार पडला. दोघांच्या साखरपुडा सोहळ्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कारण भाग्यश्री व विजय यांच्या साखरपुडा समारंभाला बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसह हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या या समारंभाची चांगलीच चर्चा रंगली.