चित्रपट, नाटक, मालिका या सर्वच माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अतिशा नाईक. अतिशाने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘आभाळमाया’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ , ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांत काम करत ती लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयाने जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती कायम चर्चेत असते. अशातच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Atisha Naik On Instagram)
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिला झालेल्या त्रासाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिला स्विगीच्या निराशाजनक कामगिरीमुळे झालेल्या त्रासाबद्दल पोस्ट केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “स्विगी इंडिया मला दुर्दैवाने ही समस्या इथे सांगावी लागत आहे. मी १५ नोव्हेंबर रोजी अंधेरी डॉमिनॉस येथून पिझ्झा ऑर्डर केला होता. आणि तुमच्या स्विगी पार्टनरने ती ऑर्डर आम्हाला न कळवताच रद्द केली. यानंतर आम्ही अनेकदा तुम्हाला ई-मेल्स व मॅसेजेस करून कळवण्याचा प्रयत्न केला. पण तुमच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही किंवा मला माझे पैसे सुद्धा परत आले नाहीत आणि हे एका नेहमीच्या ग्राहकासाठी फारच दुःखदायक आहे.”
यानंतर तिने “यापुढे तुम्ही स्विगीवरून काही ऑर्डर करायच्या आधी दोनदा विचार करा” असा म्हणत तिच्या चाहत्यांनादेखील आवाहन केले आहे. व या अशा समस्यांपासून सावध राहण्याविषयी इशारा दिला आहे. त्यामुळे स्विगीच्या निराशाजनक कामगिरीवर अतिशा नाराज झाली असून तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.
दरम्यान, अतिशा नाईकने आपल्या कारकिर्दीत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. चित्रपट, नाटक, मालिका, रिऍलिटी शो या सर्वच माध्यमांतून अतिशाने आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीत तिने तिच्या अभिनय कौशल्याची वेगळीच छाप पाडली आहे.