हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतला एकेकाळचा मराठमोळा ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. ‘अशीही बनवा बनवी’ या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी तुफान गाजली. अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केलं आहे. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.
मनोरंजनविश्वात त्या आजही सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. अश्विनी भावे यांनी किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्या मुलांचे बालपण शिक्षणही अमेरिकेतच गेलं.
अश्विनी भावे सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो व व्हिडीओमधून त्यांच्या परदेशातील घराची खास झलकही पाहायला मिळते. आकर्षक वस्तूंनी अभिनेत्रीचे घर सजलेले पाहायला मिळत आहे. ऑफ व्हाईट रंगाने अश्विनी यांचे घर रंगवलेले आही फोटोंमधून पाहायला मिळत आहे. अश्विनी यांच्या अमेरिकेतल्या घराच्या आजूबाजूला सुंदर बगिचा असून या बगिच्यामध्ये त्या शेतीही करतात.
अश्विनीने तिच्या अमेरिकेतील घराभोवती सुंदर फुलांची तसेच फळभाज्यांची बाग फुलवली आहे. त्यांच्या प्रशस्त घराबरोबरच त्यांच्या घरातील स्वयंपाकघरही अगदी प्रशस्त आहे. मोठा हॉल, मोठे किचन व आकर्षक बेडरूम्सने अश्विनी भावे यांचे घर सजलेले आहे.
दरम्यान, अश्विनी भावे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ‘अशीही बनवाबनवी’, ‘वजीर’, ‘कळत नकळत’, ‘ध्यानीमनी’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘सरकारनामा’, ‘सगळे सारखेच’, ‘एक रात्र मंतरलेली’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. तर हिंदीत ‘सैनिक’, ‘हेना’, ‘बंधन’, ‘चित्ता’, ‘तेरी महोब्बत के नाम’ यांसारख्या चित्रपटातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.