कलाकार व ट्रोलिंग हे एक आता समीकरणचं तयार झालं आहे. प्रत्येक कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होताना दिसतो. ही कलाकार मंडळी कधी कामामुळे, कधी शरिरयष्टीमुळे तर कधी वयामुळे ट्रोल होताना दिसतात. पण या ट्रोलिंगला अनेक कलाकार सडेतोडपणे उत्तर देताना दिसतात. या ट्रोलिंगला सडेतोड असे उत्तर देण्यात एका अभिनेत्रीचा खारीचा वाटा आहे ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या डान्स व्हिडीओवरुन, वयावरुन त्यांनी केलेल्या ड्रेसिंगवरुन सतत ट्रोल होत असतात. मात्र या ट्रोलर्सना ऐश्वर्या नेहमी मोजक्या शब्दात सणसणीत उत्तर देत असतात. (Aishwarya Narkar On Trolling)
सध्या ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजवर ऐश्वर्या यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्रीचं सौंदर्य एखाद्या तरुणाईला लाजवेल असं आहे. नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या ऐश्वर्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अशातच पुन्हा एकदा ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलिंगवर वाचा फोडली आहे.

ऐश्वर्या या नेहमीच वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसतात. विशेषतः त्या त्यांच्या फॅशन सेन्सकडे विशेष लक्ष देतात. अर्थात त्या साड्यांना प्रथम प्राधान्य देताना दिसतात. अशातच ऐश्वर्या यांनी एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यांत त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला असून त्यावर बुद्धाचे चित्र प्रिंट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. हे पाहून अनेकांनी त्यांना असे देवाचे फोटो प्रिंट केलेले ब्लाउज घालू नका असा सल्ला दिला.
अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर, “ताई असे ब्लाउज वापरु नका”, “बुद्ध यांचे प्रिंट असलेले ब्लाऊज घालून रील करताय लाज वाटली नाही का?”, “मुद्दाम करता का रे असे ब्लाउज घालायची नाटकं”, “असे बुद्धांचे चित्रण असलेले कपडे वापरु नका. अपमान वाटतो”, असं म्हणत सल्ला दिला आहे. तर “हा काय फालतूचा ट्रेंड बनवला आहे. ब्लाउजवर बुद्ध प्रिंट करताय. हे खूप लाजिरवाणं आहे”, असं म्हणत एका नेटकऱ्याने ऐश्वर्या यांच्या ड्रेसिंग वरुन बोल लगावले आहेत. यावर ऐश्वर्या यांनी कमेंट करत, “कापड मी प्रिंट केलं नाही. मला आवडलंय”, असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरत आहे. ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याची ही कमेंट स्टोरीला पोस्ट करत, “बुद्धांचे विचार डोक्यात असूदेत”, असं म्हटलं आहे.