अलीकडे इंग्रजी शाळांकडे मराठी मुलांचा, पालकांचा ओढा अधिक असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण तरी मराठी शाळांमध्ये देण्यात येत असलेले शिक्षण हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असते. हीच जाणीव मनात ठेवत अलीकडे अनेक मराठी कलाकार आपल्या पाल्यांना जाणीवपूर्वक मराठी शाळांमध्ये शिकायला पाठवतात. किंवा ठरवून मराठी भाषेत शिक्षण देतात. असंच आपल्या मुलांना मराठी भाषेची गोडी लावणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. नाटक, मालिका व चित्रपट या सर्वच माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा डंका वाजवत वैभव यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. केवळ अभिनयातच नाही, तर गायनामध्येही वैभव मांगले यांनी आपली झलक दाखवली आहे.
वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटो व व्हिडीओ शेअर करतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्यही करताना दिसतात. त्यांची मतं कधी नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात, तर कधी खटकतात. अशातच वैभव यांनी त्यांच्या मुलांचा शेअर केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. वैभव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्यांची मुलं वाचन करताना दिसत आहेत.
वैभव यांच्या मुलांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये वैभव यांचा मुलगा व मुलगी मराठी वृत्तपत्राचे वाचन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलांची मराठी भाषा सुधारावी या हेतूने त्यांनी हा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओसह त्यांनी “मराठी वृत्तपत्र वाचन सक्तीचे केले आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली अनेकांनी याबद्दल कौतुक केलं आहे. तसेच या मुलांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, वैभव यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. शिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’ ही मालिका व ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ अभिनयातच नाही, तर गायन, सूत्रसंचालन व विनोदी कलाकार म्हणून त्यांनी चांगलं नाव कमावलं आहे.