सध्या बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक दमदार चित्रपटाची रांग लागली आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर प्रभासचा ‘सालार’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय ‘ऍनिमल’ व ‘सॅम बहादूर’ हे चित्रपट अद्यापही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहेत. या सर्व बिग बजेट चित्रपटाच्या यादीत एका मराठमोळ्या चित्रपटाने आपली जागा कायम राखली असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’. हिंदी चित्रपट आल्यानंतर मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा खोडून काढत ‘झिम्मा २’ चित्रपटाने नाव कमावलं आहे. (siddharth chandekar on Jhimma 2)
‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासून चर्चेत होता. प्रेक्षक ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली. सात महिला व एका पुरुषाभोवती फिरणाऱ्या या कथानकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. शिवाय या चित्रपटातील “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज” या गाण्याने सर्वांना ठेका धरायला लावला. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहणं रंजक ठरलं. हिंदी सिनेमांच्या यादीत अद्याप हा चित्रपट तग धरून आहे याचंही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने पोस्ट शेअर करत थिएटर बाहेरील चित्रपटांचे पोस्टर शेअर केले आहेत. या फोटोसह, “या फोटोत सगळं काही आलं आहे. पाच आठवडे ताठ मानेनं लढत आलेला आपला ‘झिम्मा २’. मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला का? तर केला. शो कमी झाले का? तर झाले. पण केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद, आणि एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. अजून अनेक मोठे सिनेमे येऊन ठाकलेत. येऊदे. तुमचं प्रेम असंच टिकलं तर तुमचा ‘झिम्मा २’ पण टिकेल. आणि तुम्हाला ‘आयुष्य सुंदर आहे’ हे पुन्हा एकदा पटवून देणारे चित्रपट आम्ही बनवणं थांबवणार नाही. मराठी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांचे खूप आभार! मनापासून” असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
याशिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेदेखील यावरुन पोस्ट शेअर केली आहे. “आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे. पाचव्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसह उभं ठाकून आपला असा हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला. अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल. अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल. बास अजून काय पाहिजे? याचं सगळं श्रेय तुमचंच. तुम्हीच कर्ते करविते. खूप खूप धन्यवाद!” असं म्हणत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.