पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत चोख उत्तर दिलं. देशभर सरकारच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे. दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्णाण झालं आहे. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये गोळीबार केला. पूंछमधील गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं. या गोळीबारात १५ सामान्य नागरिक ठार तर ४० हून अधिक जखमी झाले. यामध्ये लहान मुलं व महिलेचाही समावेश आहे. शिवाय भारतीय सैन्यातील एक जवानही गोळीबारात शहीद झाला. या संपूर्ण तणावाविषयी कलाक्षेत्रामधूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (Sayaji shinde talk about sindoor operation)
प्रसारमाध्यमांशी सयाजी यांनी संवाद साधला. यावेळी भारत-पाक तणाव व सध्याची परिस्थिती याविषयी संवाद साधला. ते म्हणाले, “मी अगदी नेमकं सांगू शकत नाही. पण तहान लागली की, विहीर खोदायला घ्यायची. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे म्हणायचं. हे कितपत सत्य आणि खरं होणार आहे हे मला माहित नाही. पण जे आहे ते करायलाच पाहिजे. मॉकड्रीलद्वारे चांगलं प्रशिक्षण दिलं जात आहे. जनतेला सावध केलं जात आहे. आग लागली तरी माणसं घरातून खाली उतरायला हजार प्रश्न विचारतात. मी का खाली उतरु? असं म्हणतात”.
आणखी वाचा – “निरपराध लोकांचे जीव जातायत”, पाकिस्तानकडून गोळीबार होताच भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “थांबवा…”
“माणसांमध्ये कंटाळा आहे. मतदान तरी आपण नीट कुठे करतो?. मतदान नीट केलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. मतदानाची प्रक्रियाच कुठे नीट होते?. तिथेच आपली सगळी मुळं आहेत. एकदा निवडून दिलं तर आपल्या हातात काही राहतच नाही. हे पण परत आपलं एक मुळ आहे. आता मतदान केलं आहे तर बघत बसा नक्की काय होतंय ते?. आपल्या हातात तेवढंच आहे. आपण काहीही बोललो तरीही त्याने काही फरक पडणार नाही. कारण आपणच निवडून दिलेलं आहे”.
“युद्ध कधीच व्हायला नको. इथेच काय कोणत्याच देशात, राज्यात व्हायला नको. माणूस म्हणून माणसाकडे माणसासारखं बघायला शिकलं पाहिजे. पहलगाम हल्ल्यानंतर अशाप्रकारचीच घटना पुन्हा घडून नये म्हणून जे करायला हवं ते केलं पाहिजे. माणसं मारुनच अद्दल घडवावी असं असतं का ते?. उच्च पातळीवरती याचा सगळा विचार व्हावा”. सयाजी यांचा टोला नक्की कोणाला? हे चित्र अजूनही स्पष्ट नाही.