हॉलिवूडचा लोकप्रिय ॲनिमेटेड चित्रपट ‘मुफासा: द लायन किंग’ हा चित्रपट नुकताच २० डिसेंबर २०२४ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॅरी जेनकिन्स यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये भारतीय चाहत्यांसाठी एक खास मेजवानी आहे, ती म्हणजे निर्मात्यांनी मुफासा आणि सिम्बाच्या प्रसिद्ध पात्रांना बॉलिवूडमधील कलाकारांचा आवाज दिला आहे. या चित्रपटातील भूमिकांना शाहरुख, आर्यन आणि अबराम यांच्याशिवाय मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे आणि मियांग चेंग यांनी आपला आवाज दिला आहे. (Saorabh Choughule on Marathi Actors)
‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपटाला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच मराठी अभिनेता सौरभ चौगुले ‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपट पाहायला गेला होता आणि तेव्हा त्याच्या निदर्शनास एक गोष्ट आली ती म्हणजे या चित्रपटामधील काही भूमिकांना ज्या बॉलिवूड आणि मराठी कलाकारांचा आवाज लाभला आहे, त्यांची नावे चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिली आहेत. यामध्ये शाहरुख खान, अबराम खान आणि आर्यन खान यांची नावे मोठ्या अक्षरात लिहिली आहेत. याउलट मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे व संजय मिश्रा यांची नावे लहान अक्षरात आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप, घरातच आढळला मृतदेह
याबद्दलची खंत सौरभने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि या पोस्टसह त्याने असं लिहिलं आहे की, “शाहरुख खान समजू शकतो…. पण आर्यन आणि अबराम यांचे नाव Bold (ठळक) का??? बाकी दिग्गज मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे व संजय मिश्रा यांचे नाव अस Secondary (दुय्यम) लिहायचं किती चुकीचं आहे? नक्कीच या सगळ्यांचं फिल्म इंडस्ट्रीसाठीच योगदान अबराम आणि अबराम खानपेक्षा जास्तच आहे”. एकूणच मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे व संजय मिश्रा दिग्गज कलाकारांना दिलेल्या दुय्यम वागणुकीबद्दल सौरभने खेद व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – 02 December Horoscope : मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खास, जाणून घ्या…
दरम्यान, कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमधून सौरभ चौघुले प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनयासह सौरभ सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो आणि सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर अनेक विषयांवर भाष्यही करत असतो. अशातच त्याने ‘मुफासा: द लायन किंग’मधील मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे व संजय मिश्रा यांपेक्षा अबराम खान आणि आर्यन खान यांची नावे मोठ्या अक्षरात लिहिण्याबद्दल भाष्य केलं आहे.