मराठी मनोरंजन क्षेत्रातली प्रसिद्ध असलेली मित्रांची जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर ही जोडी. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्यातील मैत्री प्रत्येकाला आपलीशी वाटते. हे दोघे सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी कुशलने संतोषचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. हा व्हिडीओ होता संतोषच्या वाढदिवसानिमित्त कुशलकडून त्याला हव्या असलेल्या गिफ्टचा. १२ डिसेंबर रोजी अभिनेता संतोष जुवेकरचा वाढदिवस साजरा झाला. संतोष त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट मिळावे म्हणून कुशलला घेऊन मॉलमध्ये गेला होता. (santosh juvekar took shoes from kushal badrike)
मात्र तिथे गेल्यानंतर संतोषची फजिती झाली. झालं असं की, संतोषला कुशलकडून एका लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून हवे होते. पण दोघेही मॉलमध्ये पोहोचले तेव्हा समजलं की, त्या ब्रॅंडचं शोरुम कायमचंच बंद झालं आहे. यावेळी कुशलने संतोषच्या झालेल्या फजितीची झलक सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. संतोषचा हा कुशलकडून महागडं गिफ्ट घेण्याचा प्लॅन फसला आणि हे सगळं कुशलने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं. मात्र आता संतोषने या फजितीचा बदला कुशल कडून घेतला आहे.
संतोषने कुशलकडून त्याला हव्या असलेल्या लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून कुशलकडून घेतले आहेत. संतोषने कुशलला ते शूज ऑनलाइन मागवायला लावले आहेत आणि याचाच व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे. या व्हिडीओसह कुशलने असं म्हटलं आहे की, “आणि मग तो ऑनलाइन त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट जबरदस्तीने बुक करायला लावतो आणि मग मला रस्त्यात गाठून त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन बाय न करता निघूनसुद्धा जातो”.
तसंच या व्हिडिओमध्ये कुशल असं म्हणत आहे की, “टोल नाक्यावरची वसूली आता बंद झाली आहे, ही खोटी बातमी आहे. खरी बातमी ही आहे की, टोल नाक्यावर कलाकारांना अडवून वसूली केली जात आहे”. कुशल हे म्हणत असतानाच संतोष त्याच्या गाडीतून नाचत नाचत उतरतो आणि तो कुशलकडून त्याचे गिफ्ट घेतो आणि पुन्हा गाडीत बसून निघूनही जातो. यादरम्यान, कुशल असं म्हणतो की, “शेवटी संतोषला जे शूज हवे होते ते त्याने माझ्याकडून ऑनलाइन मागवून घेतले आहेत”.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी
दरम्यान, कुशल-संतोष यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसादही दिला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओखाली “अरे शेवटी दोस्ती रे कुश्या संत्याची”, “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा”, “मित्र असेच हरामी असतात”, “ही दोस्ती तुटायची नाय” अशा अबेक कमेंट्स केल्या आहेत.