‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत खांडकेकर व मृणाल दुसानिस यांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अभिजित व मृणाल ही जोडी लोकप्रियतेस आली. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेचं सर्वत्र कौतुक झालं. या मालिकेत संजय मोने यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. (sanjay mone interview)
‘द क्राफ्ट’ या युट्युब चॅनेलला नुकतीच संजय मोने यांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना संजय मोने यांनी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेदरम्यानच्या आठवणी शेअर केल्या. संजय यांनी यावेळी बोलताना अभिजीत व मृणाल यांच्या अभिनयाचं व मेहनतीचं कौतुक केलं आहे. दोघांच्या मेहनतीबाबत त्यांनी एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून साऱ्यांना मालिकेच्या त्या दिवसाची आठवण ताजी झाली.
हा किस्सा सांगत संजय मोने म्हणाले, “त्या काळामध्ये मी अभिजीत, मृणालबरोबर काम करत होतो. मला आठवतंय एकदा सोमवारी त्यांचं चित्रीकरण सुरु झालं ते अगदी गुरुवारपर्यंत सतत सुरु होतं. आम्ही मधून मधून घरी जाऊन येत होतो. आम्ही घरुन जाताना त्यांना काहीतरी खायला बनवून घेऊन जात होतो. तितकं तरी त्यांना खायला मिळू दे असं वाटायचं. त्यांची चिकाटी खूप आहे. मी आयुष्यात कितीही पैसे दिले, एक बेट जरी दिलं तरी मी असं काम करु शकत नाही”.
पुढे ते म्हणाले, “मी मुळात आळशी आहे. डेडिकेशनने कदाचित करेन परंतु इतक्या लांब कालावधीसाठी करु शकत नाही. दोन वर्षाचा असतो तेव्हाही केलं नाही आणि दोनशे वर्षाचा झालो तरीही करणार नाही. परंतु ही मालिका मला त्यांच्या कष्टामुळे लक्षात राहिली. दोघांनी अवर्णनीय काम केलं आहे. एखादा मोठा भोगदा दोन लोकांना खणावा लागला तर किती कष्ट करायला लागतील तेव्हढं काम त्यांनी केलं आहे. हे माझ्या लक्षात आहे”.