riteish deshmukh news : आदर्श पालक म्हणून सिनेसृष्टीत रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे मुलांवर असलेल्या संस्काराचे नेहमीच कौतुक केले जाते. रितेश आणि जिनिलिया यांनी नेहमीच त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे राहील आणि रियान यांना चांगलं वळण लावलं आहे. अभिनयासह ते दोन्ही मुलांची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवतात. त्यांचं शिक्षण, त्यांची आवड या गोष्टी रितेश आणि जिनिलिया अगदी मुलांच्या कलेने जपतात. अशातच रितेश व जिनिलिया यांनी त्यांचा मुलगा रियानच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. लेकाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त रितेश-जिनिलियाने पत्राद्वारे पोस्ट शेअर केली आहे.
रितेशने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “My Dear डार्लिंग रियान. आज तू ११ वर्षांचा झालास आणि माझं हृदय आज अभिमानाने अन् प्रेमाने भरुन गेलं आहे. सर्वांची काळजी घेणारा, नेहमी विचार करुन वागणारा, दयाळू स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळुहळू तू एकदम समजूतदार मुलगा होत आहेस. तुझ्या स्वभावातील हे सकारात्मक पैलू पाहून खरंच खूप छान वाटतं. तुझ्यामुळे आज मला आणि तुझ्या आईला आम्ही दोघं या जगातले सर्वात ‘लकी पॅरेंट्स’ आहोत याची जाणीव होत आहे”.
रियान, तू कळत-नकळत मला बरंच काही शिकवून जातोस. प्रत्येक गोष्टीवर मनापासून कसं हसायचं, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन कसं जगायचं. उद्याच्या गोष्टींची चिंता आज न करता आनंदाने दिवस घालवायचा आणि नेहमी जगाकडे हसतमुखाने पाहायचं. हे मी तुझ्यामुळे शिकलोय. साध्या-साध्या गोष्टी इतक्या सुंदर असू शकतात याची जाणीव मला तुझ्यामुळे झाली. आपल्या घरी क्रेझी डान्स स्टेप्स करणं किंवा बेडवर पडून तुला झोप येईपर्यंत गोष्टी सांगणं या सगळ्या गोष्टींमुळे मला कायम आनंद मिळतो. My Sweet Boy तू माझं सर्वकाही आहेस.
आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
मी तुला वचन देतो की, तुझ्या प्रत्येक मॅचेसमध्ये मी तुला सर्वात जास्त चिअर करेन. तुझ्या प्रत्येक गोष्टी शांतपणे ऐकून घेईन आणि जोपर्यंत तुला माझी गरज आहे तोपर्यंत हा बाबा कायम तुझा हात धरुन राहील. रियान. तुला जवळ घेतल्यावर माझं मन शांत होतं, तुझ्या चेहऱ्यावरच्या गोड हास्याने आपलं संपूर्ण घर आनंदी होतं. ११ व्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा माय सनशाइन! या येत्या वर्षात तुला भरभरून आनंद अन् प्रेम मिळो. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. माझं तुझ्यावर खूप-खूप प्रेम आहे आणि हे प्रेम कायम असंच राहणार.





