मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकलेल्या पाहायला मिळाल्या. कलाकारांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. चाहते मंडळीही कलाकारांच्या या लग्नसोहळ्याकडे डोळे लावून बसले होते. स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, अमृता बने-शुभंकर एकबोटे या कलाकार जोड्या एकामागोमाग एक लग्नबंधनात अडकल्या. या दरम्यान एका कलाकाराच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. तो अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. (Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Video)
प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर त्यानंतर प्रथमेश लग्नबंधनात अडकला. क्षितिजासह लग्नगाठ बांधत प्रथमेशने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. प्रथमेशने २४ फेब्रुवारी रोजी लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. काल प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला दोन महिने पूर्ण होताच त्यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रथमेशने या व्हिडीओमध्ये त्याच्या लग्नातील खास झलक सर्वांसमोर शेअर केली आहे. यावेळी प्रथमेश त्याच्या भावनाही व्यक्त करताना दिसत आहे. लग्न लागताना अंतरपाट धरलेला एक व्हिडीओ समोर आला तेव्हा प्रथमेश यावेळी असं म्हणताना दिसला की, “सिनेमाच्या लाईफमद्ये असं असत की पडद्यावर एक नवीन आयुष्य घडतं असतं, आणि हा आमच्या लग्नातील अंतरपाट हा एक पडदा होता, आणि त्याच्या मागे माझी हिरोईन उभी होती. आणि आता ही माझी हिरोईन मला आयुष्यभर साथ देईल”, असं म्हणत त्याने अक्षता पडल्यावर वाटणाऱ्या भावना चाहत्यांसह शेअर केल्या.
या व्हिडीओमध्ये प्रथमेश व क्षितिजा यांचा वरमाला घालतानाचे, तसेच पुण्यवचन व कन्यादाचे काही खास क्षण पाहायला मिळाले. दोघेही लग्नासाठी फारच उत्सुक असलेले दिसले. शिवाय त्यांचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्यांनतर त्यांचा रिसेप्शन लूकही समोर आला, यावेळी दोघांनी रोमँटिक डान्सही केलेला पाहायला मिळाला. प्रथमेश व क्षितिजाच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देत लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.