मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने आजवर त्याच्या अभिनयाने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रसाद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तो नेहमीच शेअर करताना दिसतो. सिनेसृष्टीत प्रसादने आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. आणि स्वतःच असं स्थान निर्माण केलं. अशातच आता प्रसादच्या आयुष्यातील एका अवघड प्रसंगाविषयी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अभिनेत्याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात अवघड प्रसंगाविषयी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. (Prasad Oak Emotional Incident)
‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, “करोनाची पहिली लाट येऊन गेली होती. आणि हा काळ खूप डेंजर होता. आपण सगळेच भयानक, अनामिक भीतीमध्ये जगत होतो. थोडी करोनाची झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी दिली. पण त्याकरता मुंबईतून बाहेर जाणं फार गरजेचं होतं. जेणेकरून एक युनिट त्या बायो-बबलमध्येच राहिल. म्हणजे त्या युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा एकही माणूस त्या जागेत आत येणार नाही. अशा पद्धतीने त्या कामाचे नियम सरकारने बनवले होते. ते अगदी जसेच्या तसेच नियम पाळत ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’चं पूर्ण मोठं युनिट मुंबई सोडून दमणला पोहोचलं”.
पुढे प्रसाद म्हणाला, “दमणमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हास्यजत्रेचा सेट बांधला होता. तिथेच आम्ही चित्रीकरण करणार होता. २९ एप्रिलला आम्ही दमणमध्ये पोहोचलो. सगळे सेटल झालो आणि ३० एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिला एपिसोड सकाळी ९ वाजता सुरू होणार होता. आम्ही सकाळी ६, ७ वाजता उठलो. आवरायला लागलो. उठून जरा फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे ८ ते १० मिस्डकॉल होते. मी झोपलो होतो. मी उठल्यानंतर ते पाहिलं. मग मी फोन केला. तिने मला सांगितलं की, माझे वडील गेले”.
पुढे तो म्हणाला, “मुळात मी पुण्याचा असल्यामुळे पुण्यात खूप चांगले मित्र आहेत. ओळखी आहेत. एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळेचे पुण्यातील वैद्यकीय अधिकारी होते, त्याच्याशी संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं, माझे वडील आहेत. तर आपण काय करु शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे. अर्धा तास, पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करता आहात, विनंती करताय म्हणून १५ मिनिट किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो. पण तुम्ही आता दमणला आहात आणि आता ते पुण्यात आहेत. पुण्यात यायला तुम्हाला कमीत कमी ६ ते ७ तास लागतील. एवढा वेळ आम्ही ठेवू शकत नाही. भयंकर दबाव आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करु शकत नाही असं तो म्हणाला.
“हे ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता कुठेही जाण्याचा. एकतर प्रवास करताना खूप बंधन होती. त्यावेळी आपण सहज प्रवास करू शकत नव्हतो. एवढं करून ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना विनंती केली की, भाऊ व्हिडीओ कॉल लावेल शेवटचं वडिलांना बघू दे. ते म्हणाले, नाही साहेब. इथे मोबाइल आणण्याची परवानगी नाही आहे. तुमचे भाऊ मोबाइल बाहेर ठेऊन आलेत. त्यामुळे तेही शक्य नाही. मी म्हटलं, तुमच्याकडे असेल, तुमच्या फोनवरुन व्हिडीओ कॉल लावता का? ते म्हणाले, मला परवानगी नाही. मी हे नाही करू शकत. त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही. थोड्यावेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो”, असं प्रसाद म्हणाला.