अभिनेता प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी ओक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. प्रसाद हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दोघांनीही शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. तसेच ते दोघे एकमेकांबरोबर इन्स्टाग्रामवर धम्माल व्हिडीओ देखील बनवताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसाद व त्याची पत्नी नेहमीच सक्रिय असतात.अशातच मंजिरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये मंजिरीने तिच्या लेकांचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. (prasad oak and manjiri oak children)
मंजिरी व प्रसादला दोन मुलं आहेत. मंजिरीने तिच्या लेकाचं कौतुक करत त्याचा अभिमान असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. मंजिरीने पोस्ट शेअर करत सार्थकचा सायकलबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सार्थक व प्रसाद एका महागड्या गाडीबरोबर उभे असलेले दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत मंजिरीने असं म्हटलं आहे की, “सार्थक, जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीत असायची तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता अजूनही आहे. तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला म्हणजे ३ सप्टेंबर २००२ला मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्याने तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती, पण त्याला काळजी होती की तू ती चालवताना पडलास तर?, तुला लागलं तर? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही”.
पुढे तिने लिहिलं आहे की, “अर्थात आपण हळूच तो नसताना सायकल चालवायला जायचो. त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्यानंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच व तसाच अगदी लहान मुलासारखा आनंद आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ३ सप्टेंबर २०२४ ला तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस. मी नको म्हणाले तर तू म्हणालास की, बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. त्याऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल. माझ्याकडे शब्द नाही आहेत सार्थक. फक्त एवढंच सांगते की, खूप खूप अभिमान वाटतो तुझा व मयांकचा. खूप मोठा हो. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. “B”est “M”any “W”ishes “, असं कॅप्शन देत मंजिरीने या खास क्षणाची पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. लेकाच्या या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी दोघेही परदेशात गेले होते. सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली आहे. त्याच्या या पदवी प्रदान सोहळ्याचा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता.