सिनेसृष्टीत कलाकारांना ट्रोलिंग हा विषय काही नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीत तर अनेक कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकतात. काही दिवसांपासून अभिनेता चिन्मय मांडलेकर हा ट्रोलिंगच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुलाचं नाव जहांगिर ठेवलं यावरुन अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं गेलं. यावर अभिनेत्याने सोशल मीडियावरुन स्पष्टीकरणही दिलं. नेटकरी कलाकारांचं काम न पाहता थेट त्या कलाकारांना ट्रोल करुन मोकळे होतात. बरेचसे कलाकार या ट्रोलिंगला उत्तर देताना दिसतात तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. (Mahesh Manjarekar On Trollers)
अशातच अभिनेते महेश मांजरेकर यांनी देखील सोशल मीडिया व त्याचा होणारा गैरवापर तसेच ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे. महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात ते व्यस्त आहेत. नुकतीच त्यांनी एबीपी माझा या वहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना महेश यांनी सततच्या ट्रोलिंगवर व सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत भाष्य केलं.
यावेळी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “राग हा यायलाच हवा. लोकं म्हणतात दुर्लक्ष करा. का दुर्लक्ष करायचं. तुम्हाला कोणी हक्क दिला. मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही बघितला, तुम्ही तो पाहायला पैसे दिले तर तुम्हाला हक्क आहे सांगायचा की, मला सिनेमा आवडला नाही. माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटीसाईज केलंत तर माझं काहीही म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडिल, माझी मुलगी, माझी बायकोला यापैकी कोणालाही बोलायचा हक्क देत नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानाखाली मारेन”.
पुढे ते असंही म्हणाले की, “तुम्ही माझ्या कामावर बोला पण दरवेळी माझ्या आईला का मध्ये घेता. मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का?, एकदा तर माझ्या मुलीबद्दल इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं की, त्यानंतर मी त्याला शोधलं आणि तक्रार केली. अशांना का माफ करावं. पण हे कधी संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एखादा कायदा तयार केला जाईल, तेव्हा हे सगळं लगेच संपेल”.